नाशिक :  मनपा तर्फे आज शुक्रवारी (दि. २४) पुष्पोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. दोन वर्षानंतर पुष्पोत्सव होत आहे.  तीन दिवसीय पुष्पोत्सवाचे उद्घाटन सिनेअभिनेत्री अर्चना  निपणकर यांच्याहस्ते करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उद्यान विभागाचे उपायुक्त विजयकुमार मुंदे उपस्थित होते. उद्यान विभागाकडून पुष्पोत्सवाचे आयोजन शुक्रवारपासून करण्यात येत असल्याची माहिती आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी  दिली.

या उद्घाटनप्रसंगी राज्याचे बंदरे व खनिकर्म व जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ. गंगाधरन, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची उपस्थिती असणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार हेमंत गोडसे, आ. सीमा हिरे,आ सरोज अहिरे, आ देवयानी फरांदे, आ राहुल ढिकले आदींची उपस्थिती असणार आहे.महापालिका १९९६ पासून पुष्पोत्सवाचे आयोजन करत आहे. २०११ पासून खंड पडला होता. पुढे २०१९ पासून यास पुन्हा सुरुवात करण्यात आली. नंतर कवि-११मुळे दोन वर्षे पुष्पोत्सवाचे आयोजन करता आले नाही. या अडचणी दूर होऊन नाशिक महानगरपालिकेने शुक्रवार रविवारदरम्यान पुष्पोत्सवाचे आयोजन केले आहे. दरम्यान प्रवेशद्वारावर कमान  प्रांगणात सेल्फी पॉइंट उभारण्यात येणार आहे. प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण मिनीएचर लॅन्डस्केपिंग कार्यालयाच्या तिसर्या मजल्यावर विविध गटांची मांडणी, विविध गटांमध्ये गुलाबपुष्पे मौसमी फुले, फळे, भाजीपाला, हार, बुके, पुष्परचना, बोन्साय, कॅक्टस, शोभिवंत कुंड्या ठेवल्या जाणार आहेत. पुष्पोत्सव उद्घाटनानंतर पुढील दोन दिवस हे पुष्प प्रदर्शन नागरिकांना मोफत प्रवेश असून, सर्व पुष्पप्रेमींनी या प्रदर्शनाचा लाभ शुक्रवारी सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत घेता येणार आहे. शुक्रवारी नृत्य रंगप नृत्यांचा कार्यक्रम होणार आहे. शनिवारी (दि. २५) स्वर सुगम हा युगम व शाखीय संगीताचा कार्यक्रम होणार आहे. रविवारी (दि. २६) कार्यक्रमाचा समारोप होणार असून त्या दिवशी विजेत्यांना ट्रॉफीजचे वितरण अभिनेता भारत गणेशपुरे यांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवास सिनेअभिनेता चिन्मय उदगीरकर किरण भालेराव यांची देखील उपस्थिती असणार आहे.  या पुष्पोत्सवास नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार व उपायुक्त विजयकुमार मुळे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!