नाशिक : शहर
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या चेहऱ्यावर दगडी पाटा घालून हत्या करणाऱ्या पतीस न्यायालयाने जन्मठेप व दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सागर गणपत पारधी (वय २३, रा. मुंजाबाबा गल्ली, फुलेनगर, पंचवटी) असे आरोपी पतीचे नाव आहे.
पंचवटीतील फुलेनगर येथील मुंजाबाबा गल्लीत १८ जुलै २०२० ला सागरने पत्नी आरती पारधी ( वय १८) हिच्या चारित्रावर संशय घेऊन घरातच तिचा गळा आवळून व तोंडावर दगडी पाटा घालून खून केला होता. त्याच्याविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केली. सहाय्यक निरीक्षक एम. एस. शिंदे, अंमलदार श्रीकांत कर्पे यांनी दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची अंतिम सुनावणी होऊन बुधवारी (दि. २९) जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. आर. राठी यांनी आरोपीस सबळ पुराव्यानुसार जन्मठेप व २५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावासाची शिक्षा सुनावली. खटल्यात पक्षातर्फे सहाय्यक सरकारी सरकारी अभियोक्ता योगेश कापसे व रेश्मा जाधव यांनी कामकाज पाहिले. पैरवी अधिकारी हवालदार एम. एम. पिंगळे, हवालदार डी. बी. खैरनार यांनी पाठपुरावा केला.