नानेगावला सोमवारी पहाटे बिबट्या पिंजऱ्यात बंदिस्त.
nnप्रमोद रहाणे l देवळाली कॅम्प:- नजीकच्या दारणा तीरावरील नानेगाव येथे उसाच्या मळ्यात लावलेल्या पिंजऱ्यात सोमवारी पहाटे साडेतीन वर्षाची बिबट मादी पिंजऱ्यात बंदीस्त झाली. त्यामूळे परिसरातील शेतकरी आणि रहिवाश्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.nnदारणा काठच्या नानेगाव शिवारात गेल्या पंधरा दिवसापासून शेतकऱ्यांना शेतीचे कामे करीत असतांना बिबट्याचे दर्शन होत होते. त्यामुळे रात्री, पहाटे शेतात पाणी भरण्यासाठी किंवा दिवसभर शेती काम करण्यासाठी मजूर येत नव्हते. तर शेतकरीही जीव मुठीत घेऊन काम करीत होते. शेतकऱ्यांनी वन विभागाकडे या भागात पिंजरा लावण्याबाबत मागणी केली होती. त्यानुसार मनोहर बबन शिंदे यांच्या गट नंबर 434 मधील उसाच्या क्षेत्रात तीन चार दिवसापूर्वी पिंजरा लावन्यात आला होता. मात्र बिबट्या पिंजऱ्याकडे फडकला नाही. अखेर सोमवारी पहाटे बिबट्या पिंजऱ्यात अडकला. याची चाहूल गावकऱ्यांना लागताच त्यांनी बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती. बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याची खबर गावकऱ्यांनी वन विभागाला दिली. वनअधिकारी विजयसिंह पाटील, अशोक खानजोडे यांनी बिबट्यास सुरक्षितरित्या नाशिकच्या गंगापूर रोपवाटिका येथे हलवले. तेथे त्याची तपासणी करुन त्यास पुन्हा नैसर्गिक अधिवासात मुक्त केले जाणार असल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली.
