एकाच रात्रीत तीन घरफोड्या अन् खून
नाशिक लोकल वृत्तसेवाnर्ीनाशिक : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच सरकारी कर्मचार्याप्रमाणे पोलिस दलही कामाला गुंतलेला असतानाच दुसरीकडे गुन्हेगार मात्र सुसाट सुटले असल्याचे दिसून येत आहे. उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दित असलेल्या खोडदे नगर आणि शांतीपार्क परिसरात एकाच रात्रीत तीन घरफोडीच्या तर एक खुनाची घटना घडली. वाढत्या चोरट्यांनी एकप्रकारे पोलिसांना आव्हानच दिले आहे.nनिवडणुकीसाठी सर्व सरकारी कर्मचार्यांना कामाला जुंपण्यात आले आहे. त्यात पोलिसांवर मोठी जबाबदारी आहे. निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिल, याची काळजीच पोलिसांना घ्यावी लागत आहे. मतदानाला अजून बारा दिवस बाकी असले तरी वाहन तपासणी, अवैध मद्य, गुटखा वाहतूक, घातक शस्त्र बाळगणे आदी गैरप्रकारांना आळा घालण्याचे काम सुरू आहे.nयात गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून त्यांना आणि त्यांच्यासोबत पार्ट्या करणार्यांनाही हद्दपार केले जात आहे. असे असले तरी शहरातील गुन्हेगारी मात्र कमी व्हायचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे.nमंगळवारी रात्री उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दित तीन घरफोडीच्या घटना घडल्या. खोडदे नगरमध्ये दोन बंद फ्लॅटचे कुलुप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. चोरीच्या उद्देशाने कपाट उचकटून कपाटातील सामान अस्ताव्यस्त फेकले. त्यानंतर शांतीपार्क परिसरातही एका बंद फ्लॅटचे कुलुप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याच रात्री साडे अकराच्या दरम्यान उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दिचा भाग असलेल्या रोकडोबा वाडी जवळ एका युवकाचा धारदार शस्त्राने हल्ला करून खून करण्यात आला. निवडणुकीची धामधुम सुरू असतानाच खून, घरफोड्यांचे सत्र सुरू असल्याने शहरवासीय भयभीत झाले आहेत.nहद्दपार, मोक्का यासारखे अस्त्र वापरूनही गुन्हेगारी घटना कमी होत नसल्याने गुन्हेगारांनी एकप्रकारे पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले आहे.
