नाशिक : विशेष प्रतिनिधी
लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी अठरापगड जातीसाठी काम केले. गोपीनाथ मुंडे हे आपल्या कामामुळे लोकनेते या बिरूदाचे मुकुटमणी होत असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. शनिवारी (दि १८)
नांदूरशिंगोटे, ता. सिन्नर, येथे लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मारकाचे व पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी पालकमंत्री दादा भुसे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डाॅ. भारती पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार प्रितम मुंडे, खासदार हेमंत गोडसे, माजी मंत्री छगनराव भुजबळ, बाळासाहेब थोरात, पंकजाताई मुंडे, आमदार नरेंद्र दराडे, किशोर दराडे, माणिकराव कोकाटे, देवयानी फरांदे, मोनिका राजळे, सुहास कांदे, हिरामण खोसकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जि.प च्या मुख्य कार्यकारी अधिकारी अमिषा मित्तल, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शितल सांगळे, माजी आमदार प्रकाश वाजे, उदय सांगळे, हेमंत धात्रक आदि मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, हे सरकार शेतक-यांचे, सर्वसामान्यांचे आणि गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांवर चालणारे असल्याने शेतक-यांनी घाबरून जाऊ नये, असे आश्वासन देत अवकाळी पाऊसाने झालेल्या नुकसानीची भरपाई शासन देणार, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला.
राज्याच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिकांना नजरेसमोर ठेवून योजना आखल्या आहेत. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत भरघोस तरतुद केली आहेत. उसतोड कामगारांच्या मुलांसाठी प्रमुख शहरांमध्ये वसतीगृह उभारण्यात येतील. उसतोड कामगार महामंडळास निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असे आश्वासन देऊन स्व.गोपीनाथ मुंडे यांना विनम्र अभिवादन केले.
*स्व. मुंडे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेऊ: नितीन गडकरी*
लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अग्रेसर होते. समाजातील तळागाळातील नागरिकांसाठी ते योद्धे होते. दलित, पिडीत, शोषित, गरीब समाजाला न्याय देण्यासाठी आपले आयुष्यपणास लावले. कृष्णाखोरे, तापी पाटबंधारे विदर्भ सिंचनाच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांसाठी काम केले. मानवतेच्या, एकतेच्या, समतेच्या आधारावर सर्व समाजाचा विकास होण्यासाठी गोपीनाथरा मुंडे प्रयत्नशील होते. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत असताना शेतक-यांच्या मुलांसाठी विविध योजना राबवाव्या लागतील. शेतकरी अन्नदाताबरोबरच उर्जा दाता बनला पाहिजेत. स्मार्ट सिटी बरोबरच स्मार्ट व्हिलेज ही संकल्पना अंमलात आणणे गरजेचे आहे. असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
माजी मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, भगवान बाबांची भक्ती, शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार आचरणात आणणारे, गोरगरीब जनतेसाठी झटणारे गोपीनाथराव मुंडे यांचे स्मारक उभे राहत आहेत याचा अभिमान आहे. स्व. मुंडे आणि गडकरी यांची काम करण्याची पध्दत एकसारखी होती. या दोघे ज्येष्ठ नेत्यांचा विकासाचा वारसा पुढे चालवू असे आश्वासित करून गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ उसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतीगृह, औरंगाबाद येथे दवाखाना उभारा, असे आवाहनही पंकजा मुंडे यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उदय सांगळे यांनी तर उपस्थितांचे आभार माजी आमदार प्रकाश वाजे यांनी मानले.
कार्यक्रमास राज्यभरातून नागरिक मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते