HomeUncategorizedवंचित बहुजन आघाडीतर्फे नाशकात मोर्चा

वंचित बहुजन आघाडीतर्फे नाशकात मोर्चा

महागाईसह विविध मुद्यांकडे शासनाचे वेधण्यास
नाशिक-वाढती महागाई,कांद्याचे गडगडलेले भाव, शेतकऱ्यांच्या शेतमालाला मिळत असलेला मातीमोल भाव,राज्यातील तसेच नाशकातील ढासळलेली कायदा व सुव्यवस्था स्थिती, बेरोजगारी व अवकाळीने शेतंमालाचे जे नुकसान झाले त्याची शेतकऱ्यांना भरपाई मिळावी तसेच कष्टकरी,झोपडपट्टीवासीयांच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे महानगरप्रमुख अविनाश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गोल्फक्लब ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला.नंतर विविध मागाण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले.
घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या दरात भरमसाठ वाढ झाल्याने महागाईने अत्युच्च टोक गाठले आहे.सर्वसामान्यांचे बजेट त्यामुळे अक्षरशः कोलमडून पडले आहे.खाद्य पदार्थ आणि वाहतुकीच्या दरातही भरमसाठ वाढ झाली आहे.त्यामुळे सर्वसामान्य जनतेस दिलासा देण्यासाठी गॅस दरवाढ मागे घेण्यात यावी आणि गॅसवर दिली जाणारी सरसकट सबसिडी पुन्हा सुरू करून ती सर्वांच्या बँक खात्यात वर्ग करावी.
शेतकरी हा देशाच्या विकासाचा कणा आहे.मात्र कधी दुष्काळ,अतिवृष्टी तर कधी अवकाळी पाऊस याने तो पुरता हवालदिल झाला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी कर्जाच्या विळख्यात सापडत आहेत.आर्थिक गणित जुळत नसल्याने शेतकऱ्यांना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागते हे दुर्दैवच म्हणावे लागेल.शेतकऱ्यांच्यादृष्टीने असलेले हे दुष्टचक्र थांबविण्यासाठी त्यांचे कर्ज माफ केले पाहिजे,नुकसानीपोटी त्यांना वेळोवेळी योग्यप्रमाणात भरपाई दिली पाहिजे अशी आमची आपणास कळकळीची विनंती आहे.
शेतमालाचे भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.त्यातच कांदा कवडीमोल भावाने विकावा लागत असल्याने शेतकऱ्यांना कोणी वालीच उरलेला नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.हमीभावाच्या मागणीसाठी बळीराजाला रस्त्यावर उतरावे लागते याहून दुर्दैव ते काय.त्यामुळे कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी नाफेडमार्फत मोठ्याप्रमाणात कांद्याची खरेदी झाली पाहिजे.तसेच कांदा उत्पादकांना अनुदान म्हणूब प्रति क्विंटल 600 रुपये दिले पाहिजेत.राज्यातील कायदा व सुव्यवस्था स्थिती पुरती ढासळली आहे.नाशकात तर दिवसाढवळ्या खून,छेडछाडीच्या घटना घडत असल्याने सामान्य जनता जीव मुठीत धरून जीवन जगावे लागत आहे.तरी सामान्यांच्या रक्षणासाठी आणि विशेषतः महिला वर्गाच्या सुरक्षतेसाठी महानगरात पोलिसांची संख्या तसेच रात्रीची गस्त वाढविण्याची आवश्यकता आहे.अंबड पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र मोठे असल्याने त्याचे विभाजन करून आणखी एक पोलीस ठाणे निर्माण व्हावे अशी सर्व घटकांची आणि विशेषतः उद्योजकांची आग्रही मागणी आहे.त्यास सरकारने हिरवा कंदील दाखविल्याचे सांगण्यात येते मात्र हे विभाजन प्रत्यक्षात अस्तित्वात येईल तो सुदिनच म्हणावा लागेल,असेही निवेनात नमूद करण्यात आले आहे.
राज्यात बेरोजगारीने कळस गाठला आहे. पदव्या असूनही नोकऱ्यांसाठी वणवण भटकावे लागत आहे.नोकऱ्यांअभावी अनेकजण नको त्या मार्गाला लागतात आणि त्यांचे जीवन धोक्यात येते.त्याला आळा घालण्यासाठी शासनाने मोठ्याप्रमाणात रोजगार उपलब्ध करावेत किंवा त्यांना अल्पदरात कर्जपुरवठा करून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे.नाशिक महानगरात 165 झोपडपट्टया आहेत.परंतु तेथे आवश्यक त्या मुलभूत सुविधा नसल्याने झोपडपट्टीवासियांना हलसखीचे जीवन जगावे लागत आहे.तरी त्यांच्या हिताच्या दृष्टीने त्याभागात मूलभूत सुविधा तातडीनें उपलब्ध करून द्याव्यात.चुंचाळे आणि राजीवनगर झोपडपट्टीला स्लमचा दर्जा मिळावा.पूर्वी चुंचाळे गावात सातबाऱ्याच्या उताऱ्यावर महारांची घरे अशी नोंद होती.मात्र अधिकारी वर्गाने बिल्डरलॉबीच्या दबावाखाली येऊन ती नोंद सताबारावरून काढल्याचा आमचा आरोप आहे.तरी चुंचाळे येथील ज्या सातबाराच्या उताऱ्यावर महारांची घरे अशी नोंद होती ती पूर्वीप्रमाणे कायम ठेवावी आणि ज्यांनी या नोंदींमध्ये फेरफार केला त्यांचा शोध घेऊन त्यांच्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत आदी मागण्यांचाही निवेदनात समावेश आहे. आमच्या वरील सर्व मागण्यांची दखल घेऊन संबंधित सर्व घटकांना योग्य न्याय द्यावा.तसे न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे महानगर प्रमुख अविनाश शिंदे, महासचिव संजय साबळे संदीप काकडीज,बजरंग शिंदे,अनिल आठवले,दामोदर पगारे,चेतन गांगुर्डे, रवी पगारे,बाळासाहेब शिंदे,विश्वनाथ भालेराव,ज्ञानेश्वर अभंग,कल्याण खरात,संकेत पगारे,नटाबाई जगताप, काळूबाई शिंदे,नीतू सोनकांबळे, प्रतिभा पानपाटील,छाया गांगुर्डे,शोभा मोरे,उषा गांगुर्डे,सोनाली गायकवाड, दीपक पगारे,विनोद दोंदे,अमोल घोडे अदींसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!