July 13, 2026

देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन सोनोने यांचा अपघाती मृत्यू

0

प्रमोद रहाणे l देवळाली कॅम्प :- देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन सोनोने हे कर्तव्यावरून सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान घरी जात असताना लष्करी हद्दीतील वडनेर रोडवर त्यांचा अपघाती मृत्यू झाला. घटनेची खबर मिळताच सर्वांना मानसिक धक्का बसला. पोलीस ठाण्यासह देवळालीकरांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.अपघात प्रकरणी रात्री उशीरा पर्यंत देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात कुठलीही नोंद झालेली नव्हती. सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यावर हा एक आघातच होता. घटनेबाबत प्राप्त माहिती अशी की, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन सोनवणे हे गुरुवार दिनांक २१ डिसेंबर रोजी सायंकाळी आपले कर्तव्य निभावून आपल्या एम एच 15 सी वाय 4014 या दुचाकीवरून देवळाली कॅम्प ते वडनेर रोड मार्गे त्यांच्या अशोका मार्गावरील खोडे वस्ती, विठ्ठल नगर येथील घरी निघाले होते.nnवडनेर रोड परिसरात हेग लाईन मार्गावर असलेल्या लष्कराच्या पेट्रोल पंपाजवळ लष्कराच्या गाडीचा धक्का त्यांना लागल्याने ते दुचाकी सह रस्त्यावर कोसळले. त्यात त्यांना गंभीर मार लागला. हा अपघात झाल्यानंतर उपस्थित लष्करी जवानांनी त्यांना उपचारासाठी तातडीने देवळाली येथील लष्करी रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील डॉक्टर अशोक यांनी तपासणी केली असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. मयत कुंदन सोनोने यांचे पशचात आई, पत्नी, २ मुले, २ भाऊ असा परिवार आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन सोनोणे हे दोनच महिन्यापूर्वी नाशिकरोड पोलीस ठाण्यातून देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात बदलून आले होते. त्यांची नाशिक मधील कारकीर्द संस्मरणीय ठरली. नाशिक शहरात कार्यरत असताना त्यांनी अनेक क्लिष्ट गुन्ह्यांचा तपास यशस्वीपणे केला. मटका, जुगार, हुक्का पार्लर, अवैध धंदे, बेकायदेशीररित्या वाहनात गॅस फिलिंग, खंडणी बहाद्दर, सराईत गुन्हेगार यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना गजाआड करण्यात मोलाची भूमिका पार पाडली. त्यांच्या कामगिरीबद्दल पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी त्यांचा सन्मान देखील करण्यात आलेला होता. अतिशय हुशार, मनमिळावू , हसतमुख, धार्मिक वृत्तीचे आणि कर्तव्यदक्ष असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या अपघाती मृत्यूने त्याच्या परिवारावर दुःखाचा डोंगरच कोसळला. संपूर्ण पोलिस आयुक्तालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी हळहळ व्यक्त केली. अनेकजण या धक्यातुन अद्यापही सावरले नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *