Homeताज्या बातम्याशहरासह जिल्ह्यात अवकाळी पाऊस

शहरासह जिल्ह्यात अवकाळी पाऊस

नाशिक लोकल वृत्तसेवा
र्ी नाशिक : अक्षयतृतीयेच्या दिवशीच शुक्रवारी (दि. 10 मे) नाशिक शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. तप्त वातावरणाला अवकाळी पावसाच्या सरींनी घटकाभर दिलासा लाभला असला तरी हा अवकाळी पाऊस नुकसानदायी ठरला आहे.
नाशिक शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात शुक्रवारी दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. दुपारी 3 वाजेनंतर शहराच्या काही भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने एकच तारांबळ उडाली आहे. शुक्रवारी अक्षय्या तृतीया निमित्त घराबाहेर खरेदी करण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांचे अचानक आलेल्या पावसाने मोठ्या प्रमाणावर हाल झाले. नाशिकच्या अंबड, सातपुर, नाशिकरोड, नविन नाशिक, पंचवटी भागात दुपारनंतर ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. तसेच, सोसाट्याच्या वादळी वार्‍यामुळे काही ठिकाणी रस्त्यांवर झाडेही उन्मळुन पडल्याचे वृत्त आहे.
गोविंद नगर या भागातील मुख्य रस्त्यावर झाडांच्या फांद्या उन्मळून पडल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली. सिडकोत वादळी वार्‍यामुळे घरांच्या परिसरातील आंब्याच्या झाडांवरील उतरणीला आलेल्या कैर्‍या तुटून पडल्या.
अक्षय्य तृतीया असल्याने नागरिक खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडले मात्र अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे त्यांची तारांबळ उडाली, तसेच हातगाड्या, पदपथांवरील विक्रेत्यांचेही हाल झाले.
सिन्नर शहरासह तालुक्यात अवकाळीचा तडाखा बसला. दुपारनंतर वातावरणात प्रचंड उष्णताही वाढल्याचे जाणवत होते. त्यानंतर पाऊस बरसला. शहरासह तालुक्यातील डुबेरे, मनेगाव परिसरातही पावसाच्या सरी बरसल्या. तसेच , पुर्व भागातील पांगरी, वावी, शहा, पंचाळे परिसरातही दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होऊन विजांचा कडकडाट सुरु झाला होता. त्यानंतर काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. तसेच नांदुरशिंगोटे, दोडी, दापुर परिसरातही काही भागात पावसाच्या सरी बसरल्या.
तालु्क्यातील सरदवाडी, पास्ते, जामगाव परिसरात जोरदार पावसासह गारा पडल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सरदवाडी, पास्ते परिसरात मुबलक पाण्यामुळे अनेक शेतकर्‍यांचे बाग आहेत. या गारांचा फटका बागांना बसण्याची शक्यता आहे. तसेच शेतात साठवण्यात आलेल्या मालाला व चार्‍यालाही यामुळे फटका बसला असून शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!