तोतया सहायक पाटीलच्या कोठडीत वाढ
तोतया सहायक पाटीलच्या कोठडीत वाढnnनाशिक : शहरnnआमदाराचा स्वीय सहायक असल्याचे भासवत शासकीय नोकरी लावण्याचे आमिष दाखवत बेरोजगारांना चुना लावणाऱ्या सुशील भालचंद्र पाटील याच्या कोठडीत न्यायालयाने पुन्हा तीन दिवसांची वाढ केली आहे. सोमवारी (दि. १०) त्यास जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणाची व्याप्ती वाढत असल्याने त्याची कोठडी वाढवून देण्याची मागणी गुन्हे शाखेने केली होती.बनावट ओळखपत्राच्या जोरावर त्याने विधानपरिषदेसह विधानसभेत अनेकांशी सलगी वाढवल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात पुढे आली असून, पोलिसांनी त्याचे ओळखपत्र जप्त केले आहे. या प्रकरणात अजून सहा तक्रारदार पुढे येण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तविली आहे. तत्कालीन गृह राज्यमंत्र्यांचा खास असल्याचे सांगत एका आमदाराचा स्वीय सहायक असल्याची बतावणी संशयित सुशील पाटील करायचा. तरुणांना शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत त्यांच्याकडून त्याने दोन कोटी ७६ लाख रुपये उकळले आहेत.
