हरसुल सराईत गुन्हेगाराचा खुन
हरसुल सराईत गुन्हेगाराचा खुनnनाशिक : हरसुलnnहरसूल माळेगाव येथे पाच जणांनी सराईत गुन्हेगाराचा खून केल्याची घटना बुधवारी (दि. १९) सायंकाळी घडली. यात आदित्य श्याम डोकफोडे (२२, रा. गिरणारे) याचा खून झाला. या प्रकरणी हरसूल पोलिसांनी संशयित सोपान बोबडे (२५, रा. गिरणारे) यास ताब्यात घेतले आहे.nहरसूल पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार, आदित्यचा खून सोपान व त्याच्या चार साथीदारांनी मिळून मारहाण करीत केला. पोलिस तपासात आदित्य हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. बुधवारी (दि. १९) दुपारी 3.30 च्या सुमारास आदित्य डोकफोडे व इतर दोघांनी गिरणारे परिसरात सूरज नंदू बोबडे याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. या प्रकरणी नाशिक तालुका पोलिस ठाण्यात आदित्यसह तिघांविरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. दरम्यान, भावावर हल्ला केल्याच्या रागातून सोपान बोबडे व इतर संशयितांनी आदित्यचा पाठलाग करून त्याचा खून केला. आदित्य हा सोपान व त्याच्या कुटुंबीयांना नेहमी दमदाटी, शिवीगाळ करीत धमकावत होता. याबाबत आदित्यविरोधात ग्रामीण पोलिसांकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र पोलिसांनी आदित्यवर ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप होत आहे. त्यातच आदित्यने भावावर प्राणघातक हल्ला केल्याने सोपान व इतरांनी मिळून लाकडी दांडा व कोयत्याने वार करून आदित्यचा खून केला. या प्रकरणी हरसूल पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल असून पोलिसांनी सोपानला अटक केली आहे. आदित्यवरील गंभीर गुन्ह्यांमुळे त्याला तडीपार करण्याचाही प्रस्ताव तयार केला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
