मनपाच्या घनकचरा प्रक्रिया केंद्रात प्लास्टिक पासून इंधन तयार होणार, ‘बॅलेस्टिक सेपरेटर’ आणि ‘प्लास्टिक टू फ्युएल’ हे दोन संच कार्यान्वित
nnनाशिक : शहरातून जमा होणाऱ्या कचऱ्यावर जास्तीत जास्त कार्यक्षमतेने प्रक्रिया करून विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने कचरा वर्गीकरण करणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्याकरिता नाशिक वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्पात सद्यस्थितीत ट्रोमेल द्वारे वर्गीकरण करण्यात येते. परंतु येणाऱ्या कचऱ्याचे आणखी चांगल्या पद्धतीने वर्गीकरण करण्यासाठी २५० मेट्रीक टन प्रतिदिन क्षमतेचा नवीन बॅलेस्टिक सेपरेटर संच उभारण्यात आला आहे. त्याद्वारे सुक्या कचऱ्याचे तीन ते चार प्रकारात योग्य प्रकारे वर्गीकरण होते. त्यापासून उच्च प्रतीचे आरडीएफ तयार करणे शक्य होणार आहे. तसेच दैनंदिन कचऱ्यात प्लास्टिकचे प्रमाण बघता त्यातील चांगल्या प्रतीच्या प्लास्टिकपासून इंधन तयार करणे शक्य आहे. त्या दृष्टीने सदर केंद्रामध्ये पाच लिटर प्रतिदिन क्षमतेच्या ‘प्लास्टिक टू फ्युएल’ या संयत्राची उभारणी करण्यात आली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या उपस्थितीत हे दोन्ही संयंत्र आज दि. ३ मे २०२३ रोजी कार्यान्वित करण्यात आले. यामुळे शहरातील दैनंदिन कचऱ्यावर आणखी चांगल्या पद्धतीने प्रक्रिया करणे आणि विल्हेवाट लावण्याचे काम होणार आहे.nनाशिक महानगरपालिकेने २००१ पासून घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्याकरिता प्रक्रिया केंद्र उभारले आहे. सदर केंद्रात २००१ मध्ये ओल्या कचऱ्यापासून खत तयार करण्याचा ३०० मेट्रिक टन प्रतिदिन क्षमतेचा प्लान्ट उभारण्यात आला होता. त्यानंतर २००८-०९ मध्ये त्यात वाढ करून प्रकल्पाची क्षमता पाचशे मेट्रीक टन प्रतिदिन इतकी वाढवण्यात आली. या केंद्रामध्ये जळाऊ कचऱ्यापासून आरडीएफ तयार करण्याच्या प्रकल्पाचाही समावेश करण्यात आला.nn*घनकचरा प्रकल्पातील उत्पादने*nnसन २०१६ पर्यंत सदर केंद्र नाशिक महानगरपालिका मार्फत चालविण्यात येत होते. केंद्राचे कामकाज सुरळीत व कार्यक्षमतेने होण्याच्या दृष्टीने व आवश्यते प्रमाणे क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने सन २०१७ मध्ये सदर प्लांट खाजगी एजन्सी मार्फत चालविण्यासाठी हस्तांतरित करण्यात आला. सदर केंद्रात ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती, सुक्या कचऱ्यापासून आरडीएफ निर्मिती, गार्डन वेस्ट व पालापाचोळ्यापासून ब्रिकेट तयार करणे, प्लास्टिक पासून प्लास्टिक दाणे तयार करणे, कचऱ्यातील लीचेटवर प्रक्रिया करणे, मृत जनावरे शवदाहीनी, सायंटिफिक लँडफील, जुन्या लँडफीलचे सायंटिफिक कॅपिंग इत्यादी बाबींचा समावेश आहे.nप्रकल्प उद्घाटन प्रसंगी मनपाचे अधीक्षक अभियंता (यांत्रिकी) उदय धर्माधिकारी, अधीक्षक अभियंता (सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग) शिवाजी चव्हाणके, कार्यकारी अभियंता (यांत्रिकी) बाजीराव माळी, नाशिक वेस्ट मॅनेजमेंट कंपनीचे संचालक कर्नल सुरेश रेगे, उपमहाव्यवस्थापक मयुरेश अमराळे, उप अभियंता (यांत्रिकी) सुनील खैरनार, जनसंपर्क अधिकारी गिरीश निकम आदी अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.n…………………………………………………………………………………………………
