अडीच वर्षाच्या बालकाला विहिरीत फेकून देत हत्या
nnनाशिक : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत रागाच्या भरात अडीच वर्षाच्या बालकाला थेट विहिरीत फेकून देत त्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक जिल्ह्यात घडला आहे. दिंडोरी तालुक्यातील म्हाळुंगी येथील ही घटना असून पत्नीच्या फिर्यादीवरून पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित पतीला अटक केली आहे.nदिंडोरी तालुक्यातील कादवा म्हाळुंगी या गावात हे कुटुंब वास्तव्यास आहे. वर्षा राजेंद्र आपसुंदे व राजेंद्र छबू आपसुंदे हे दोघे या ठिकाणी राहतात. राजेंद्र हा पत्नी वर्षा यांच्या चारित्र्यावर संशय घेत वाद घालायचा. या दोघांना अडीच वर्षाचा एक मुलगा आहे. हा मुलगा माझा नाही, असे बोलत तिचा मानसिक छळ करत होता. त्यातुनच त्यांनी रागाच्या भरात मुलगा घनश्याम यास गावातील निवृत्ती देवराम निकम यांच्या विहिरीत टाकून जीवे मारले असल्याची तक्रार वर्षा यांनी दिली.nया प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी संशयित राजेंद्र शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोनिका जेजोट या पुढील तपास करत आहेत.
