हॉटेल मालकास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न फरारी संशयित आरोपीस गुंडाविरोधी पथकाने केले जेरबंद
nnअंबड : येथील हॉटेल मैफल बार अॅण्ड रेस्टॉरंटचे मालक व त्यांच्या दोन मुलांवर हल्ला करून खुनाचा प्रयत्न करून पाच महिन्यांपासून फरार असलेला संशयित आरोपी ललित राजू कदम यास गंगापूर रोड परिसरातून जेरबंद करण्यात गुंडाविरोधी पथकाला यश आले आहे.nnगुंडाविरोधी पथकाचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, सहायक उपनिरीक्षक मलंग गुंजाळ, डी. के. पवार, सुनील आडके, राजेश सावकार, प्रदीप ठाकरे, मिलिंद जगताप, गणेश नागरे, अक्षय गांगुर्डे, संदीप आंबरे, गणेश भागवत यांनी संयुक्तरीत्या ही कामगिरी बजावली आहे.nपोलिसांनी माहितीनुसार, २९ जानेवारी २०२३ रोजी अंबड येथील हॉटेल मैफल बार अॅण्ड रेस्टॉरंटचे मालक अशोकnnगोविंदराव काच्छेला हे हॉटेल बंद करत असताना संशयित आरोपीने त्यांच्याकडे विअरची मागणी केली. तेव्हा काच्छेला यांनी हॉटेल बंद करत असल्याचे सांगितल्याने त्याचा संशयित आरोपीला राग आला. त्यातून त्याने काच्छेला व दोन मुलांना शिवीगाळ करून जिवे ठार मारून टाकू, अशी धमकी देऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी अंबड पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला होता. मात्र, तेव्हापासून आरोपी ललित कदम हा फरार होता. गुंडाविरोधी पथक फरारी आरोपींचा शोध घेत असताना आरोपी ललित राजू कदम हा गंगापूर रोडवरील विद्याविकास सर्कल येथे येणार ना असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्यास अटक करण्यात आली. त्याला अंबड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
