शहर विकासासाठी उद्योजक तसेच विविध संस्थांनी सीएसआर माध्यमातून योगदान द्यावे
नाशिक महानगरपालिकेचे क्षेत्रफळ सुमारे २६७.४८ चौरस कि.मी. इतके असून, नाशिक शहराची सध्याची लोकसंख्या सुमारे २० लाख इतकी आहे. नाशिक शहर हे औद्योगिक, धार्मिक आणि व्यावसायिकदृष्टीने झपाट्याने वाढत आहे. वाढते शहरीकरण विचारात घेऊन नाशिक महानगरपालिका स्वनिधीमधून सातत्याने विविध प्रकारचे विकास कामे, प्रकल्प आणि इतर मुलभूत तसेच पायाभूत साेयी सुविधा नाशिककर नागरिकांना पुरवित आहे. या विकास कामांसाठी शहरातील तसेच शहराशी बांधिलकी असलेल्या व्यावसायिक संस्था, उद्योजक संस्था, सेवाभावी संस्था , सामाजिक संस्था तसेच शैक्षणिक संस्था मोठ्या प्रमाणात शहराच्या विकासात योगदान देत असतात. यापुढेही अशा संस्था तसेच उद्याेगांनी शहरातील सर्व व्यावसायिक संस्था, उद्योजक संस्था, सामाजिक संस्था, सेवाभावी संस्था तसेच बांधकाम विकासकांना जाहीर आवाहन करण्यात येते की, नाशिक शहरातील विविध ठिकाणचे सुशोभिकरण करण्याच्या दृष्टीने अशा विविध कामांसाठी मोहीम हाती घेण्यात येणार असून, त्यासाठी सर्वांचेच याेगदान अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे.nnशहरातील विविध ठिकाणचे चाैक तसेच वाहतूक बेट हे शहराचा आरसा म्हणून ओळखले जातात. तसेच रस्ते दुभाजकही शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असतात. यामुळे अशा ठिकाणांचे सुशाेभिकरण झाल्यास शहराच्या साैंदर्यीकरणात निश्चितच भर पडेल. त्याच दृष्टीकाेनातून सीएसआर अर्थात कार्पोरेट सोशल रिस्पोन्सीबिलिटी निधीतून अधिकाधिक स्वरूपात निधी उपलब्ध करून द्यावा व नाशिक शहराच्या सर्वांगीण विकासाला यानिधीच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी म्हणून योगदान द्यावे, असे आवाहन डॉ.अशोक करंजकर प्रशासक तथा आयुक्त महानगरपालिका नाशिक यांनी केले आहे.
