नाशिक मनपा आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीच्या वादातून बांधकामास कॅन्टोन्मेंटची हरकत
नाशिक मनपा आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीच्या वादातून बांधकामास कॅन्टोन्मेंटची हरक
nप्रमोद रहाणे l देवळाली कॅम्पnनाशिक महानगर पालिका आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड देवळाली यांच्यात लामरोड परिसरातील सौभाग्यनगर येथे हद्दीचा वाद सुरू आहे. तो अद्याप मिटलेला नाही. असे असताना सौभाग्य नगर येथे सुरू असलेल्या अष्टपाद हाईट या बांधकाम प्रकल्पावर कॅन्टोन्मेंट बोर्डाने हरकत घेत बांधकाम थांबण्याची कारवाई केली आहे. मात्र बांधकाम प्रकल्प व्यावसायिकाच्या दाव्यानूसार कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाला येथे बांधकाम थांबविण्यास व आपला फलक लावण्याची कुठलाही अधिकार नसल्याचे म्हणणे असल्याचे कँटोन्मेंट बोर्ड बांधकाम विभागाच्या वतीने सांगण्यात आले.nदेवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डच्या सरहद्दीवर जिथे जिथे बांधकामे सुरू आहेत आणि त्यांचे लगतच्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्लॅन मंजूर केलेले आहेत अशा सरहद्दीवरील वादग्रस्त बांधकामांचा सर्वे करून हद्दीची खात्री करून त्यांना नोटीस बजवाव्यात आणि कारवाई करावी अशा स्वरूपाचे आदेश देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ .राहुल गजभिये यांनी दिलेले आहेत. त्यानुसार वादग्रस्त सरहद्दीवरील बांधकामांचा शोध घेऊन त्यांच्यावर कॅन्टोन्मेंट ॲक्ट नुसार मोजणी करून कारवाईच्या नोटिसा बजावल्या जात आहेत. त्या अनुषंगाने कॅन्टोन्मेंटचा बांधकाम आणि अतिक्रमण विभाग कामाला लागला आहे. त्यातूनच सौभाग्य नगरातील आर्क बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या बांधकाम प्रकल्पावर शनिवारी हरकत घेऊन कारवाई करण्यात आली.nदेवळाली कॅम्प कॅन्टोन्मेंट बोर्ड व नाशिक महापालिकेच्या हद्दीवर असणाऱ्या २१ बी /७ या जागेवर मे आर्क बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या बांधकाम फर्मच्यावतीने नाशिक महानगरपालिकेच्या परवानगीने रितसर प्लॅन मंजूर करून गेल्या दोन तीन वर्षांपासुन १७ मजली इमारतीचे काम सुरु करण्यात आले आहे. कॅन्टोन्मेंट प्रशासनाने संबधित जागा हि कॅन्टोन्मेंट हद्दीत असल्याचे कारण देत शनिवार दि.११ रोजी सदरचे बांधकाम बंद करण्यास भाग पाडले. कॅन्टोन्मेंटचे सहाय्यक अभियंता विलास पाटील, कनिष्ठ अभियंता ऐश्वर्या पी.व्ही, पियुष पाटील, अनधिकृत बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता भुनेश नेरकर, वसंत शेरमाळे, वासू पगारे आदींसह कर्मचाऱ्यांनी संबंधित बांधकाम प्रकल्पावर जावून तेथे सुरु असलेले काम थांबविले. बांधकामाचे मोजमाप केले. त्याच प्रमाणे बांधकामासाठी वापरात येणारे विविध प्रकारचे साहित्य जप्त केले. दरम्यान याबाबत नाशिक मनपा प्रशासन आणि संबंधित बांधकाम ठेकेदार यांना कामाबाबत नोटीस काढली जाणार असल्याची माहिती कॅन्टोन्मेंट बोर्डचे सहाय्यक अभियंता विलास पाटील यांनी दिली. तसेच याबाबत दोघांनाही पत्र देऊन कशाच्या आधारे प्लॅन मंजूर करण्यात आला त्याबाबत विचारणा देखील करण्यात आल्याचे आणि कागदपत्रे मागवण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. त्याचप्रमाणे सौभाग्य नगर आणि संसरी गावच्या शिवारातील काही भागातही लगतच्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी अशा स्वरूपाच्या बांधकामांना मंजुरी दिलेली असून हद्दीची शहानिशा करून त्यांच्यावरही कारवाई केली जाणार असल्याचे संकेत अभियंता पाटील यांनी दिले. देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डच्या सरहद्दीचा सर्वे करून तेथे झालेल्या नवीन बांधकाम धारकांना कॅन्टोन्मेंटॲक्ट नुसार मोजमाप करून नोटीसा बजावल्या जाणार आहेत. अशीही माहिती अभियंता विलास पाटील यांनी दिली.
