चंपाषष्ठी निमित्त देवळालीच्या खंडेराव टेकडीवर गुंजला जय मल्हारचा गजर
प्रमोद रहाणे l देवळाली कॅम्पnnयेळकोट येळकोट जय मल्हार,खंडेराव महाराज कि जयच्या जयघोषात, गोंधळी गीतांच्या गजरात, खोबर,बेल-भंडाऱ्याची उधळण करीत हजारो भाविकांच्या उपस्थितीत देवळालीच्या टेकडीवरील खंडोबाचा चंपाषष्ठी निमित्त यात्रोत्सव पार पडला. सायंकाळी मल्हारीभक्त उत्तम मांडे यांनी १२ गाड्या ओढल्या. यावेळी पंचक्रोशीतील भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती.nnप्रति जेजुरी समजल्या जाणाऱ्या आणि प्राचीन देवस्थान असणाऱ्या टेकडीवरील खंडेराव महाराज मंदिरात टेकडी यात्रेत पहाटे मंदिराचे पुजारी प्रकाश आमले तसेच सुशील चव्हाण यांनी सपत्नीक अभिषेक, महापूजा, व आरती केली. मार्तंड मल्हारीसह म्हाळसा-बाणाईच्या मूर्तींना नवीन पोशाख परिधान करण्यात येऊन अलंकाराने सजविण्यात आले होते. सकाळी भगूर येथून पुजारी आमले परिवाराच्या वतीने संबळाच्या तालावर मानाची निशाण काठी व पालखी मिरवणूक टेकडीवर आणण्यात आली. येथे पूजन व महाआरती झाल्यानंतर भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. पंचक्रोशीतील भाविक देवांचे टाक आणून या देवाची तळी भरून देव भेट करीत होते. त्यानंतर दुपारी साडेतीन वा. देवळालीतून मानाचा अश्व, देवाची पालखी, तसेच निशाण काठीची मिरवणूक वाजत गाजत पार पडली. सायंकाळी ५ वा. खंडेराव भक्त उत्तम मांडे यांनी बैलगाड्या ओढल्या. यावेळी ‘ खंडेराव महाराज कि जयचा गजर करण्यात आला. जिल्हयातील भाविकांनी खंडोबाच्या मंदिरात दर्शनासाठी हजेरी लावली होती. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण चव्हाण यांनी देखील मंदिरास भेट देवून खंडोबाचे दर्शन घेतले. तसेच यात्रेचा आणि बंदोबस्ताचा आढावा घेतला. टेकडीच्या परिसरात विविध दुकाने थाटण्यात आली होती. दिवसभर दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली होती. देवळाली कॅम्प पोलिस व वाहतूक पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यात्रोत्सवाच्या यशस्वीतेसाठी प्रकाश आमले,अथर्व आमले, नितीन आमले, सचिन आमले, प्रशांत म्हस्के, सतीश म्हस्के, नरेंद्र गायकवाड, रोहित गायकवाड, राजू फल्ले, भरत वाघमारे, मोहनीश दोंदे आदी प्रयत्नशील होते. सकाळी अन्नाज टेम्पल हिल ग्रुपच्या वतीने महाआरती करण्यात येऊन भरीत भाकरी प्रसाद वाटप करण्यात आला. त्यासाठी नरेश बंगाली, दीपक बलकवडे, रामनिवास सारडा, अनिल पाळदे, राजेश चव्हाण, धरम पपनेजा, प्रकाश कासार, दत्तेश परदेशी, धीरज मांडे, प्रमोद सजगुरे, नितीन नागपाल, राजू पगारे, संजय आढाव, शरद गोडसे, सतीश पाटील, सतीश गायकवाड, संजय पवार, संजय भुतडा व सहकार्यांनी परिश्रम घेतले. रात्री जागरण गोंधळ कार्यक्रमांत खंडेराव महाराजांचा विवाह सोहळा पार पडला.
