August 8, 2026

देवळालीत बिबट्याचा मुक्त संचार.

0

प्रमोद रहाणे l देवळाली कॅम्प :- देवळाली कॅम्पच्या सह्याद्री नगर लगतच्या गावंडे मळ्यात गुरुवार दिनांक २९ रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास बिबट्याने रूपाली निसाळ यांच्या घराबाहेरच्या अंगणातून त्यांच्या पाळीव श्वानावर हल्ला केला. आणि त्यास जबड्यात धरून नेत फस्त केले.देवळाली कॅम्प येथील सह्याद्री नगरच्या गावंडे मळ्यात रूपाली निसाळ यांच्या घराच्या बाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्याचा हा थरारक हल्ला कैद झाला आहे. अवघ्या काही क्षणात बिबट्या चपळाईने झेप घेऊन श्वानास नेत असल्याचे दृष्य चित्रित झाले आहे. गुरुवारी सकाळी उठल्यानंतर त्यांना बिबट्याने आपले पाळीव श्वानाला फस्त केल्याची माहिती मिळाली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. निसाळ यांनी परीसरात पाळीव श्वानाचा शोध घेत असताना त्यांना बिबट्याच्या पंजाचे ठसे अढळून आलेत. त्यामुळे परिसरातील रहिवासी धास्तावले आहेत. दरम्यान सह्याद्री नगर लगतच्या निसाळ, गावंडे मळा भागात एक नाला आहे. तो नाला वनविभाग व लष्कराच्या फायरिंग रेंज भागातून येतो. लष्कराची फायरिंग सुरू असली की बिबटे तेथून अन्न पाण्याचे शोधात नागरी वस्तीकडे धाव घेत असतात. सद्या उन्हाचा तडाखा सुरु झाल्याने पिण्यासाठी पाण्याच्या शोधात बिबटे नागरी वसाहती कडे येतात. यावेळी देखील याच नाल्याच्या माध्यमातून हा बिबट्या निसाळ, गावंडे मळा या भागात गुरुवारी पहाटे आला. आणि त्याने पाळीव श्वानाला भक्ष्य केले. आठ महिन्यांपूर्वी देखील गावंडे मळ्यात एक ४ वर्षांचा नर बिबट्या वनविभागाने पिंजरा लावून रेस्क्यू करून नेला आहे. आता पुन्हा हा बिबट्या या परिसरात संचार करीत असल्याने येथील रहिवासी यांच्यामध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. सदर बिबट्याला लवकरात लवकर रेस्क्यू करून नेण्यात यावे अशी मागणी परिसरातील शोभा निसाळ, वैशाली गावंडे, शांता गावंडे, सुवर्णा जाधव, रूपाली दळवी, दिपाली कांडेकर, संगीता उफाडे, आशा राव, छाया कांडेकर, प्रिया कांडेकर सह विठ्ठल गावंडे, रमेश दळवी, अंकुश गावंडे यांनी केली आहे. घटनेबाबत वन विभागाला माहिती देण्यात आली असून पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *