देवळाली कॅम्पला बिबट्या रेस्क्यू ऑपरेशनसाठी पिंजरा तैनात.
nn*प्रमोद रहाणे* l *देवळाली कॅम्प*:- देवळाली कॅम्पच्या जुन्या स्टेशन वाडीत पुन्हा एकदा स्थानिक रहिवाशांच्या मागणीनुसार बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी रविवारी दुपारी पिंजरा लावण्यात आला आहे. नाशिकच्या वनविभागाचे अधिकारी विजयसिंह पाटील, अशोक खांनजोडे, सोमनाथ निंबेकर यांनी जुन्या स्टेशन वाडी लगत असलेल्या नाल्यांमध्ये पिंजरा लावला. असाच एक पिंजरा देवळालीच्या सह्याद्री नगर लगतच्या निसाळ, गावंडे मळ्यात दोनच दिवसांपूर्वी लावण्यात आला आहे. सध्या देवळाली कॅम्प शहर परिसरात दोन ठिकाणी बिबट्यांना रेस्क्यू करण्यासाठी पिंजरे लावण्यात आले आहेत. यापूर्वी निसाळ, गावंडे मळा, चौधरी मळा, धोंडी रोड, बार्न्स स्कूल, पंपिंग स्टेशन, विजयनगर, करंजकर मळा, राहुरी पूल, रेस्ट कॅम्प रोड, जुनी स्टेशन वाडी, रेस्ट कॅम्प रोड वरील फरजंदी बाग, कासार मळा, लांम रोड मुळे भाग, नानेगाव, राहुरी, वडनेर गाव, पिंपळगाव बहुला भागात बिबट्यांचा मुक्त संचार दिसून आला आहे. यातील काही बिबटे रेस्क्यू करून नेण्यात आले. तर काही वनविभागाच्या हाती लागलेले नाहीत. त्यातीलच जुने स्टेशन वाडीतील नाल्यात १७ जानेवारीला २ ते ३ बिबट्यांचे अस्तित्व दिसून आले होते. त्यातील एकच बिबट्या २० जानेवारीला रेस्क्यू करून नेण्यात आला होता. उर्वरित बिबट्यांचा वावर परिसरातच होता. त्यातील बिबट्याचे दर्शन पुन्हा स्टेशन वाडीतील रहिवाशांना झाल्याने त्यांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली होती. तिची दखल घेऊन वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा स्टेशन वाडी लगतच्या नाल्यात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी पिंजरा तैनात केलाय. देवळाली परिसरातील बिबट्यांच्या मुक्त संचारामुळे देवळाली कॅम्प शहराची ओळख बिबट्यांचे माहेरघर अशी नव्याने केल्यास ते वावगे ठरू नये.
