August 7, 2026

देवळालीच्या स्टेशन वाडीतील तिसरा बिबट्या पिंजऱ्यात बंदिस्त

0

प्रमोद रहाणे l देवळाली कॅम्प:-nबिबट्यांचे माहेरघर अशी नव्याने ओळख बनू पहात असलेल्या देवळाली कॅम्प शहर परिसरात आज मंगळवार दि. १२ रोजी पहाटेच्या सुमारास एक नर बिबट्या पिंजऱ्यात सापडला. रविवार दिनांक ८ मार्च रोजी येथील जुन्या स्टेशनवाडी जवळ असलेल्या पगारे चाळ लगत असलेल्या नाल्यात स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार वन विभागाने पिंजरा लावला होता. तब्बल ९ दिवस बिबट्याने पिंजऱ्याला हुलकावणी दिली होती. मात्र मंगळवारी पहाटे अखेर बिबट्या पिंजऱ्यात सापडलाच. याच भागात वन विभागाने रेस्क्यू ऑपरेशन करून नेलेला हा तिसरा बिबट्या होय.nकाही महिन्या पूर्वी देवळाली कॅम्पच्या जुन्या स्टेशन वाडी, पगारे चाळ जवळील भिंतीवर रात्रीच्या सुमारास ३ बिबटे मुक्त विहार करीत असल्याची चित्रफित समाज माध्यमावर प्रसारित झाली होती. त्यामुळे या भागातील रहिवासी दहशतीच्या छायेत वावरत होते. वन विभागाकडे आग्रही मागणी करून पिंजरा नाल्यात रविवार दिनांक ३ मार्च रोजी लावण्यात आला होता. तब्बल ९ दिवसानंतर, गेल्या ६ महिन्यात तिसरा ४ वर्षाचा नर बिबट्या जेरबंद झाला आहे. त्याची माहिती मिळताच वन विभागाचे वन रक्षक विजयसिंह पाटील, अशोक खानझोडे, अंबादास जगताप, प्राणी मित्र विक्रम कडाळे हे पहाटे घटनास्थळी दाखल झाले. बिबट्यास रेस्क्यू करून नाशिकच्या गंगापूर रोड वरील रोपवाटिका येथे नेण्यात आले. तेथे त्यावर वैद्यकीय उपचार करून त्यास पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार आहे. जेरबंद बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. या भागातील सुयोग तपासे, सतीश भालेराव, रुपेश केदारे, राहुल उन्हवणे, सिद्धेश भवर, विमल भवर, अलका जगताप यांनी या परिसरात आणखी बिबटे असून त्यांच्या स्थलांतरासाठी तात्काळ पुन्हा पिंजरा लावावा अशी मागणी केली आहे.nnदरम्यान लष्करी रेंज मधून बिबटे नागरी वस्तीकडे धाव घेत असल्याचे वास्तव चित्र आहे. देवळाली कॅम्पच्या पश्चिम भागात लष्कराचे मोठे फायरिंग रेंज आहे. त्या भागात लष्कराचे फायरिंगचा सराव सुरू झाल्यानंतर आपला जीव वाचवण्यासाठी, भीतीपोटी बिबटे थेट नागरी वस्तीकडे धाव घेत आहेत. देवळाली कॅम्प शहराच्या सभोवताली अजूनही बिबट्यांचा मुक्त संचार आहे. देवळालीच्या निसाळ-गावंडे मळ्यात पाळीव श्वानाला भक्ष करणारा बिबट्या रेस्क्यू करण्यासाठी अजुन एक पिंजरा बिबट्याच्या प्रतिक्षेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *