नाशिक : पंचवटी
कौटुंबिक वादातून छातीत चाकू भोसकून वहिनीचा खून केल्याच्या आरोपातून न्यायालयाने अनिल पांडूरंग पाटील (वय ३७, मोरे मळा, राम नगर, हनुमानवाडी, पंचवटी) यास जन्मठेप व सहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. जिल्हा सत्र व न्यायालयाचे न्यायाधीश एस. डी. जगमलाणी यांनी हा निकाल दिला. सरकारतर्फे सहायक अभियोक्ता दीपशिखा भिडे यांनी पुरावा सादर करत युक्तिवाद केला. २ जून २००६ रोजी मोरे मळा, राम नगर, हनुमानवाडी, पंचवटी येथे हा गुन्हा घडला होता.
अभियोग कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, यातील फिर्यादी सुनिल पांडूरंग पाटील (वय ३४) यांचा भाऊ आरोपी अनिल पांडूरंग पाटील (वय ३७) हा आई सोबत वाद करून, कपडे काढून घरात जमिनीवर पडलेला असताना फिर्यादी हे त्यास असे वागणे योग्य नाही असे सांगत होते. तेव्हा फिर्यादीची पत्नी ज्योती ही देखील त्यास रागवून बोलू लागली. त्याचा आरोपीस राग येवून त्याने रागाच्या भरात फिर्यादी व त्यांचे पत्नीस शिवीगाळ करत घरातील किचन मधून चाकू आणला.
फिर्यादीची पत्नी ज्योती हिच्या छातीत उजव्या बाजूस चाकुने वार करुन केला. फिर्यादी मध्ये गेले असता त्यांच्या कमरेच्या खाली चाकुने वार करून फिर्यादी व त्यांची पत्नी (मयत ) ज्योती यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यात गंभीर जखमी झालेल्या ज्योती हिचा सिव्हिल हॉस्पीटल उपचार मृत्यू झाला.
याबाबत पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास पंचवटी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक साखरे यांनी केला होता. न्यायालयीन सुनावणीत आरोपीविरूध्द् फिर्यादी, साक्षीदार, पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अंमलदार यांनी सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपीस भादंवि कलम ३०२ मध्ये जन्मठेप व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ०३ महिने साधा कारावास. तर भादंवि कलम ३२४ मध्ये ०२ वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ०१ महिना साधा कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे.