देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस संजय पिसेचे स्वागत
देवळाली कॅम्प l प्रतिनिधी :-nदेवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून संजय पिसे यांनी नुकताच पदभार स्वीकारला. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून प्रवीण चव्हाण यांनी दिनांक १ जुलै २०२३ रोजी सूत्रे हाती घेतली होती. त्यांची बदली आडगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आयुक्तालयातील १० पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांच्या बदल्या केलेल्या आहेत. त्यांनी केलेल्या फेरबदलात देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून खंडणी विरोधी पथकाचे विद्यासागर श्रीमनवार यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली होती. त्यांनी येऊन पदभारही स्वीकारला होता. मात्र पुन्हा दुपारी निर्णयात बदल होऊन सायंकाळी नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेत २ वर्ष कार्यरत असलेले संजय पिसे यांची देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी तातडीने सायंकाळी पदाची सूत्रे स्वीकारली. संजय पिसे हे मुळचे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर नजिकच्या संतांची भूमी असलेल्या मंगळवेढे गावचे. त्यांनी एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन सन २००९ साली महाराष्ट्र पोलीस सेवेत दाखल झाले. त्यांनी ८ वर्ष नांदेड, नागपूर येथे सेवा केली. गेली २ वर्ष ते आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत होते. नागपूरला असताना त्यांनी नक्षलविरोधी अभियानात यशस्वी कामगिरी केली होती. नांदेडला असताना चोरी, घरफोडी, दरोडे, खून, खुनाचे प्रयत्न त्यांचा कौशल्याने तपास करून अनेक क्लिष्ट गुन्हे उघडकिस आणले. त्याबद्दल पोलीस खात्याकडून त्यांचा वेळोवेळी सन्मान करण्यात आला. नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांचे भगूर देवळाली कॅम्प परिसर पत्रकार संघाकडून सत्कार व स्वागत करण्यात आले. याप्रसंगी सुधाकर गोडसे, प्रमोद राहाणे, सुभाष कांडेकर, प्रशांत धिवंदे, प्रवीण आडके, शौकतअली काजी, आदींसह नाशिक रोडचे पत्रकार अन्वरखान पठाण उपस्थित होते. त्याचप्रमाणे नाशिक मराठी पत्रकार संघाच्यावतीनेही संजय पिसे यांचे स्वागत करण्यात आले. पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सुधाकर गोडसे, विद्यमान अध्यक्ष सुनील पवार यांच्या वतीने पदाधिकारी दीपक कणसे, संजय निकम, भास्कर सोनवणे, प्रमोद राहाणे, नंदू शेळके यांनी शाल, पुष्पगुच्छ देऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांचे स्वागत केले. पत्रकारांच्या भेटी प्रसंगी उभयपक्षी देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतील सामाजिक, राजकीय, भौगोलिक, परिस्थिती, कायदा व सुव्यवस्था या विषयावर सखोल चर्चा झाली. काही सूचना करण्यात येऊन एकमेकांशी समन्वय राखून सहकार्य करण्याचे निश्चित करण्यात आले. देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत कायदा सुव्यवस्था चोख राहील. गुन्हेगार, नियम, कायदेभंग करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. अशी ग्वाही वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी भेटी प्रसंगी दिली.