शासनाच्या हगणदारी मुक्त गाव योजनेला सुरुंग.
प्रमोद रहाणे l देवळाली कॅम्प:- येथील कॅन्टोन्मेंट बोर्डच्या वॉर्ड क्रमांक ७ मधील शिंगवे बहुला, अंबडवाडी, मातंग वाडा परिसरात असलेले सार्वजनिक शौचालय देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डने एक वर्षांपूर्वी जमीनदोस्त केले होते. त्या जागी दोन-चार महिन्यांपूर्वी नवीन शौचालयाचे काम सुरू केले होते. मात्र फक्त पायाभरून सदरचे काम बंद अवस्थेत रखडले आहे. त्यामुळे या परिसरातील ४०० ते ५०० लोकांची शौचालयासाठी गैरसोय होत आहे. पुरेशी व्यवस्था नसल्याने त्यांना नाईलाजाने उघड्यावर शौचास जावे लागत आहे.nnएकीकडे केंद्र आणि राज्य सरकार हागणदारी मुक्त गाव योजना राबवत आहे. मात्र देवळाली लगतच्या शिंगवे बहुला गावातील सार्वजनिक शौचालय कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने नवीन बांधण्याकरता जमीनदोस्त केले. परंतु त्याजागी नवीन शौचालय पुन्हा लवकर न बांधण्यात आल्याने परिसरातील शेकडो नागरिकांना उघड्यावर शौचालयास जाण्याची वेळ आली आहे. कारण ७०० ते ८०० लोक वस्ती असलेल्या परिसरात कॅन्टोन्मेंट बोर्डने तात्पुरती महिला, पुरुषांसाठी दोन सीटर मोबाईल टॉयलेटची व्यवस्था केली होती. सद्या ते दोन्हीही आडवे पडलेले आहेत. त्याऐवजी दोन सीटर काँक्रीटच्या शौचालयाची व्यवस्था केली. मात्र लोकसंख्येच्या मानाने ते २ अपुरे पडत असल्याने इतर लोकांना शौचालयासाठी पुन्हा उघड्यावर जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे परिसरातील रहिवासी त्रस्त झालेले आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने लवकरात लवकर सार्वजनिक शौचालयाची निर्मिती करून रहिवाशांची गैरसोय दूर करावी अशी मागणी कैलास बकुरे, नंदू लांडगे, रमेश साळवे, योगेश साळवे, सनी आल्हाट, नवनाथ साळवे, भरत झोंबाड, नवनाथ झोंबाड आणि रहिवाशांनी केली आहे.
