बंडोबांना शांत करण्यासाठी युती-आघाडी सक्रिय
नाशिक (दीपक भावसार) – नामांकनपत्र दाखल करण्याच्या अंकाच्या इतिश्रींनंतर आता सार्यांचे लक्ष माघारीनाट्याकडे वेधले आहे. महायुतीसह महाआघाडीतील घटक पक्षांतील इच्छुकांनी बंडखोरी करीत नामाकंन दाखल केल्याने युती-आघाडीपुढे बंडखोरांचे आव्हान उभे ठाकले आहे. त्यामुळे साम-दाम-दंड-भेदासह सर्व मार्गांचा अवलंब करून बंडोबांना शांत कसे करता येईल यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. सोमवारी (दि.6 मे) सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत असलेल्या माघारीच्या मुदतीत काय घडामाडी होतात, कोण अर्ज माघारी घेतो याकडे लक्ष केंद्रित झाले आहे.
n
शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अर्जांची छाननी झाली. छाननीनंतर नाशिक लोकसभा मतदारसंघातून —– तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून —– उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महाआघाडीतील घटक पक्ष शिवसेनेचे (ठाकरे गट) विजय करंजकर यांनी नाशिकमधून बंडखोरी करीत अर्ज दाखल केला आहे. तर तिकडे महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) निवृत्ती अरिंगळे यांनी बंडखोरी केली आहे. याशिवाय भाजपचे अनिल जाधव यांनीही अपक्ष उमेदवारी केली आहे. दिंडोरीत महायुतीतील प्रमुख घटक पक्ष भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी बंडांचे निशाण फडकवले आहे. त्यामुळे महायुतीसह महाआघाडीला बंडोबांचे बंड शमवण्या यश येते का याकडे सार्यांच्या नजरा न एकवटल्या तर नवलच! बंडखोरांना खाली बसविण्यासाठी शनिवारपासूनच प्रयत्न सुरू आहेत. माघारीच्या मुदतीनंतर कोणता बंडोबा खाली बसतो अन् कोण निवडणुकीसाठी ठाम राहतो याचे चित्र स्पष्ट होणार आहे.
n
मतविभागणीचा मोठा फटका बंडखोरांमुळे अधिकृत उमेदवारांना बसण्याची शक्यता असल्याने महायुतीसह महाआघाडीने हा मुद्दा अधोरेखित केला आहे. अरिंगळे आणि जाधव यांनी बंडखोरी केल्याने त्याचा फटका महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. तशीच स्थिती विजय करंजकर यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे महाआघाडीत असून, राजाभाऊ वाजे यांना अडसर निर्माण होऊ पहात आहे. दिंडोरीत माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी अपक्ष उमेदवारी करून महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्यापुढे आव्हान निर्माण केले आहे. चव्हाण यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी भाजपनेते यशस्वी ठरतात का याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे. महायुतीसह महाआघाडीकडून शांतिगिरी महाराज, सिद्धेश्वरानंद यांनी अर्ज माघारी घ्यावेत यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. तूर्त तरी दोन्ही महाराजांनी उमेदवारीवर ठाम असल्याचे सांगितल्याचे समजते.
n
n
बंडोबांना पुनर्वसनाचा शब्द?
n
बंडोबांना शांत करण्यासाठी महायुतीसह महाआघाडीकडून सर्व नीतींचा अवलंब केला जात असल्याची चर्चा असून, त्यातूनच मोठ्या आर्थिक घडामोडीही होण्याची शक्यता आहे. दाम या नीतीचीच अधिक अवलंब होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय सत्तेत आल्यास संबंधित बंडोबाचे पुनर्वसन करण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत संधी, सत्तापद, लाभाचे पद देण्याचा शब्दही दिला जाऊ शकतो. किंबहुना दिला जाईल. विजय करंजकर यांना शिवसेनेने (ठाकरे गट) विधान परिषदेवर पक्षाने संधी देण्याची तयारीही केली होती; परंतु तांत्रिक कारणामुळे करंजकरांची संधी हुकली. हरिश्चंद्र चव्हाण यांना राज्यसभेसाठी वा अन्य मार्गाने त्यांचे पुनर्वसन करण्याचा शब्द भाजपकडून दिला जाऊ शकतो. निवृत्ती अरिंगळे यांनाही असाच शब्द दिला जाऊ शकतो. त्यावर हे बंडोबा शांत झाले तर त्यांची निवडणुकीतून माघार संभवते.
