शिवाजी अढांगळे
नाशिक लोकल (उपनगर): शहरात पुन्हा एकदा भरधाव वाहनामुळे भीषण अपघात घडला असून, उपनगर परिसरात एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात आणखी दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने येणाऱ्या कारने अचानक नियंत्रण गमावून रस्त्यावरून जात असलेल्या दुचाकींना जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत संबंधित तरुणीचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की परिसरात एकच खळबळ उडाली.
या घटनेत चार ते पाच दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. धडकेनंतर काही दुचाकी रस्त्यावर फेकल्या गेल्याने वाहतुकीवरही काही काळ परिणाम झाला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ जखमींना रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, नाशिकमध्ये अलीकडील काळात भरधाव वाहनांमुळे अपघातांची संख्या वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे. यापूर्वीही वेगामुळे झालेल्या अपघातांमध्ये नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत .
या प्रकरणी पोलिसांनी कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, अपघाताचे नेमके कारण तपासले जात आहे. नागरिकांकडून मात्र वेगमर्यादेचे काटेकोर पालन आणि वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी होत आहे.