नाशिक : शहर
ट्रकमधील दुचाकी व चार चाकीचे दोन लाखाचे टायर, ट्यूब चोरणाऱ्या दोघां चोरटयांना उपनगर पोलिसांनी अटक केली.आगरटाकळीतील समतानगर येथे राहणारे ट्रकचालक चंद्रकांत गणपत सुरनर यांनी ट्रक (एमएच १५ डीके ११७७) मध्ये ओझर येथून अपोलो कंपनीचे विविध आकाराचे २५४ टायर व ट्यूब भरलेले होते. सुरनर यांना पुण्याला जायचे असल्याने त्यांनी रात्री त्यांच्या घराजवळ ट्रक उभा केला. गुरुवारी मध्यरात्री २ च्या सुमारास सुरनर हे पुण्याला जाण्यासाठी ट्रकजवळ गेले असता. ट्रकमागील बाजूस बांधलेली दोरी तुटलेली व १३ टायर, ९ ट्यूब चोरीस गेल्याचे आढळले. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली . पोलिसांना सदर चोरी संशयित दर्शन उर्फ ओंकार रवींद्र सूर्यवंशी (२४) व विशाल प्रदीप गांगुर्डे (२४, दोघे रा. समतानगर) यांनी केल्याची माहिती गुप्त समजली. यानुसार पोलिसांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. सूर्यवंशी याने चोरी केल्याची कबुली दिली. पुढील तपास उपनगर पोलिस करत आहेत.