प्रमोद रहाणे l देवळाली कॅम्प:- देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या स्टेशन रोडवरील साठे नगर येथील मुख्य रस्ता व संपूर्ण साठे नगरातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. सदरचे रस्ते तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी अण्णाभाऊ साठे नगरचे अध्यक्ष व युवा नेते चंद्रकांत लांडगे यासह येथील रहिवाशांनी केली आहे. त्यासंदर्भात खा. हेमंत गोडसे यांची भेट घेऊन लेखी निवेदन देण्यात आले.
गेल्या २० ते २५ वर्षापासून देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या दुर्लक्षामुळे येथील साठे नगर हा विकासापासून वंचित आहे. देवळाली येथून स्टेशनकडे जाण्याचा मुख्य मार्ग आहे. या मार्गावरून जाताना “रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता” असा प्रश्न येथील रहिवासी व वाहन धारकांना पडत आहे. दिवसा रात्री देवळाली व पंचक्रोशीतील नागरिक नविन स्टेशन वाडी येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी येत असतात. रस्त्याची बिकट अवस्था झाल्याने देवळालीकरांचा अंतीम प्रवासही यातनादायी होत आहे. मृतदेहाची विटंबना होत आहे. साठे नगर येथील अंतर्गत रस्तेही फुटले आहेत. रहिवाश्यांना ये जा करणे मुश्किल झाले आहे. भविष्यात दिवसा अथवा रात्री या परिसरात एखादा मोठा अपघात झाल्यास त्यास जबाबदार कोण असा सवालही साठे नगरचे अध्यक्ष चंद्रकांत लांडगे यासह येथील रहिवाशांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांना साठे नगर परिसरातील रस्त्याच्या समस्यांबाबत निवेदन देण्यात आले आहे. खासदार गोडसे यांनी तात्काळ देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाशी संपर्क साधून साठे नगर परिसरातील रस्त्यांची समस्या तात्काळ सोडवावी व साठे नगर येथील रहिवाशांना न्याय द्यावा अशी मागणी कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राहुल गजभिये यांच्याकडे केली आहे. देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाने साठे नगर परिसरातील रस्त्याच्या समस्येची तात्काळ पाहणी करून रस्ते तात्काळ दुरुस्त करावे अशी मागणी साठे नगरच्या रहिवाशांनी केली आहे. निवेदनावर साठे नगरच्या रहिवाशांच्या सह्या आहेत.