Homeराज्यातील बातमीदेवळाली रेल्वे स्थानकावर पूर्ववत प्रवासी गाड्यांना थांबा द्यावा-

देवळाली रेल्वे स्थानकावर पूर्ववत प्रवासी गाड्यांना थांबा द्यावा-

प्रमोद रहाणे l देवळाली कॅम्प :- मध्य रेल्वेच्या देवळाली कॅम्प रेल्वे स्थानकावर कोरोना काळापूर्वी सुरू असलेल्या सर्व रेल्वे गाड्यांना स्थानकावर पूर्ववत थांबा देण्यात यावा अशी मागणी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे करण्यात आली. देवळाली कॅम्प स्थानक नूतनीकरण कोनशिला अनावरण कार्यक्रमास आले असता दानवे यांना विविध राजकीय पक्ष, संघटना यांच्याकडून मागण्याचे निवेदन देण्यात आले.
अमृत भारत योजनेतून देवळाली रेल्वे स्थानक पुनर्विकास कामाच्या कोनशीला अनावरण कार्यक्रमास रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे नुकतेच देवळाली कॅम्प रेल्वे स्थानकावर येऊन गेले. त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रताप गायकवाड, प्रसाद आडके, राष्ट्रवादी काँग्रेसचे रतन चावला, रवींद्र भदाने, रिपाइं आठवले गटाचे सुभाष बोराडे, पंचवटी प्रवासी रेल्वे संघटनेचे केशव केवलानी, भगवान कटारिया यांनी रावसाहेब दानवे यांना लेखी मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यात कोरोना काळापूर्वी देवळाली रेल्वे स्थानकावर एकूण २२ प्रवासी रेल्वे गाड्या थांबत होत्या. कोरोना काळात प्रवासी घटल्याने गाड्यांचे थांबे रद्द करण्यात आले होते. त्यामुळे त्या २२ गाड्यांना पूर्ववत थांबे देण्यात यावे अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे करण्यात आली. या सर्व निवेदनकर्त्यांनी रावसाहेब दानवे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मागण्यांबाबत चर्चा केली. मंत्र्यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यावर विचार करीन अशी ग्वाही दिली.
देवळाली हे देशातील महत्त्वाचे लष्करी प्रशिक्षण केंद्र आहे. तसेच लगतच तीन किलोमीटर अंतरावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मभूमी आहे. त्यामुळे देशभरातून देवळाली रेल्वे स्थानकावर लष्करी अधिकारी, जवान तसेच सावरकर प्रेमी यांची रेल्वे स्थानकावरून ये जा सुरू असते. त्याचप्रमाणे नाशिकरोड रेल्वे स्थानकावर प्रवासी रेल्वे गाड्या तसेच मालवाहतुकीचा प्रचंड ताण आहे. आगामी सिंहस्थ काळात नाशिकरोड रेल्वे स्थानकावर प्रवासी वाहतुकीचा मोठा ताण येणार आहे. तो कमी करण्यासाठी नासिकरोड रेल्वे स्थानकाला एक उत्तम पर्याय म्हणून देवळाली रेल्वे स्थानक उपयोगी पडू शकते. तसेच लष्करी सेवेत असलेल्या अधिकारी, जवान आणि देश-विदेशातून स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मभूमीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या जाणाऱ्या सावरकर प्रेमींची सोय होऊ शकते. देवळाली रेल्वेस्थानक नाशिक, सिन्नर, इगतपुरी, या तीन तालुक्यांच्या अनेक गावांच्या सरहद्दीवर आहे. त्यामुळे या सर्व भागातील शेतमाल, औद्योगिक क्षेत्रातील उत्पादने देशात पाठवण्यासाठी देवळाली रेल्वे स्थानक स्थानकावर पुरेशी जागा, व्यवस्था उपलब्ध आहे. तिचा वापर होईल. तसेच रेल्वे स्थानकाच्या महसुलात देखील वाढ होईल. रेल्वे स्थानकावर विसंबून असणारे रिक्षाचालक व इतर व्यवसायिक यांचा देखील उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. देवळाली रेल्वे स्थानकावरून उद्योग, व्यापार, शिक्षण, व्यवसाय, नोकरी निमित्ताने प्रवाशांची मुंबई तसेच भुसावळ भागात नियमित ये जा सुरू असते. त्यांना देखील देवळाली रेल्वे स्थानक प्रवास करण्यासाठी सोयीचे आहे. या सर्व बाबींचा विचार करून देवळाली रेल्वे स्थानकावर पूर्ववत प्रवासी रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात यावा असा जनमताचा रेटा आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!