नाशिक :
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार माणिक कोकाटे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घडवून आणण्यात शिंदे गटाचे स्थानिक पदाधिकारी यशस्वी झाले असले तरी कोकाटे यांनी कार्यकर्त्यांशी बोलूनच पुढील निर्णय घेऊ, असे सांगिल्याने महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे अद्यापही गॅसवरच आहेत.
नाशिक लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे तर शिंदे गटाचे गोडसे रिंगणात उतरले आहेत. उमेदवारी मिळण्यास विलंब झाल्याने मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी गोडसे रात्रीचा दिवस करीत आहेत. तर वाजे यांना वेळेतच उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांनी अख्खा मतदारसंघ पिंजून काढला आहे. त्यामुळे गोडसे यांची धाकधूक वाढली आहे. त्यातच रूसवेफुगवे काढण्यातच त्यांचा वेळ खर्ची पडत आहे. उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले मंत्री छगन भुजबळ यांची भुजबळ फार्मवर जाऊन गोडसे यांनी भेट घेतली. दुसरीकडे सिन्नरचे आमदार कोकाटे मात्र अजूनही प्रचारात सक्रिय झाले नसल्याने गोडसे यांची घालमेल वाढली आहे. गोडसे यांच्यावर असलेली जाहीर नाराजी बोलून दाखविल्यानंतर कोकाटे यांनी आधी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू मगच पुढील निर्णय घेऊ, असे जाहीर केले होते. त्यामुळे शिंदे गटाच्या नेत्यांची धावपळ झाली. त्यांनी गुरूवारी कोकाटे आणि मुख्यमंत्री यांची भेट घडवून आणली. या भेटीत कोकाटे यांनी गोडसे यांच्याविरोधातील तक्रारींचा पाढा वाचल्याचे सांगण्यात आले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी पॅचअप करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतरच कोकाटे हे आपल्या भुमिकेवर ठाम आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत नेमकी काय चर्चा झाली, हे मी आधी कार्यकर्त्यांना सांगणार आहे. त्यांच्याशी बोलूनच पुढील निर्णय घेणार असल्याचे कोकाटे यांनी दै. नाशिक लोकलशी बोलताना सांगितले. त्यासाठी त्यांनी रविवारचा दिवस निवडला आहे. तोपर्यंत मात्र ते प्रचारात सक्रिय होणार नाही. कोकाटे यांच्या पवित्र्याने गोडसे अद्यापही गॅसवरच आहेत. कारण 20 मे रोजी मतदान होणार आहे. ते जाहीर प्रचार 18 मे रोजी संपणार आहे. त्यामुळे हातात केवळ आठ दिवस आहेत. त्यात कोकाटे यांनी रविवारी भुमिका जाहीर केल्यावर म्हणजे प्रचारात सक्रिय होण्याचे ठरविले तरी अवघे सहा दिवस त्यांना मिळणार आहे. या सहा दिवसात ते संपूर्ण सिन्नर तालुक्यातील मतदारांपर्यंत पोहचण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. त्यामुळे कोकाटे सक्रिय झाल्यानंतरही त्यांचा गोडसे यांना कितपत फायदा होणार, हा प्रत्यक्ष निकाल जाहीर झाल्यानंतरच कळणार आहे.
मुख्यमंत्र्यांशी भेट झाली. काही मुद्यांवर चर्चा केली. जी काही चर्चा झाली, ती मी कार्यकर्त्यांना सांगणार आहे. त्यानंतर नेमका काय निर्णय घ्यायचा हे मी परवा पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार आहे.
– आमदार माणिक कोकाटे