HomeCrimeसोने चोरीतील सुत्रधार अटकेत

सोने चोरीतील सुत्रधार अटकेत

नाशिक लोकल वृत्तसेवा
इगतपुरी : नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील आयसीआयसीआय होम फायनान्समधील दागिने चोरीची उकल करण्यात नाशिक स्थानिक गुन्हे शाखेच्या विभागाला यश आले आहे. पोलीसांनी संशयित आरोपीकडून 39 लाख रुपयांच्या सोन्याच्या दोन लगड जप्त केल्या आहेत. या चोरीचा मुख्य संशयित आरोपी वैभव लहामगे सराईत गुन्हेगार आहे.
इगतपुरी तालुक्यात महामार्गावर कुस्तीगिर युवकावर गोळ्या झाडत कोयत्याने वार करुन झालेल्या खुनात त्याचा सहभाग उघड झाला आहे. गुन्हे शाखेने ह्या बँकेत स्वच्छतेचे काम करणारा तुकाराम देवराम गोवर्धने (वय 35, मूळ राहणार सांजेगाव, ता. इगतपुरी, सध्या रा. उत्तमनगर) याला अटक केली आहे. त्याने यापूर्वी तपासावेळी पोलिसांना विसंगत माहिती दिल्याने पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला होता. गोवर्धने याने संशयित वैभव लहामगे या त्याच्या गावातील मित्राला बँकेबद्दलची माहिती, खिडकी, तिजोरीची जागा, सीसीटीव्ही, भोंगा यासह इतर सर्व माहिती पुरविली असल्याचे पोलिसांनी निष्पन्न केले आहे. गोवर्धने हा भाजपाचा इगतपुरी तालुका उपाध्यक्ष असल्याचे समजते. त्याच्या गुन्ह्यातील सहभागामुळे दोन महिने पाहणी करुन संशयिताने बँकेत चोरी करण्याची योजना आखली होती. संशयित वैभव लहामगे याने सतीश कैलास चौधरी, रतन जाधव (रा. सिडको) यांच्यासह चोरी केली होती. संशयित सतीश चौधरीची आई रेखा कैलास चौधरी हिच्याकडून चोरीतील 39 लाख 52 हजार 350 रुपयांचे वितळलेले सोने पोलिसांनी जप्त केले. गोवर्धने याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अशी घटली होती घटना
या घटनेत आयसी आयसी आय या होम फायनान्स कंपनीची खिडकी उघडून चोरट्यांनी चार कोटीहून अधिक किंमतीचे दागिने लंपास केले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तैनात करण्यात आले होते. सात दिवसाच्या तपासात बँकेमधील कर्मचार्यांची चौकशी करून सीसीटीव्ही चित्रण तपासण्यात आले.
सांजेगाव येथील उत्तर महाराष्ट्र केसरी पहिलवाल भूषण लहामगे याच्या हत्या प्रकरणातील संशयित त्याचा चुलतभाऊ वैभव लहामगे याने भूषणची हत्या करण्यापूर्वी बँकेत पाच कोटींच्या दागिने लूटल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यामुळे एकाचवेळी दोन गुन्ह्यांची उकल झाली असून पोलीस वैभव लहामगेची कसून चौकशी करीत आहेत. जमिनीसह आर्थिक वादातून भूषणची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!