HomeUncategorizedअखेरच्या टप्प्यात ‘ऑल इज वेल’ची मल्लिनाथी

अखेरच्या टप्प्यात ‘ऑल इज वेल’ची मल्लिनाथी

नाशिक लोकल वृत्तसेवा
र्ीनाशिक : दीपक भावसार
महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी पक्षाचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी निवडणूक प्रक्रिया अगदी तीन दिवसांवर येऊन ठेपलेली असताना प्रचारात राष्ट्रवादी सक्रिय असल्याचे सांगत ऑल इज वेल असल्याचा दावा केला. त्यामुळे आतापर्यंत ऑल इज वेल नव्हते का, प्रचारात सक्रियता नव्हती का, अशा चर्चेने जोर धरला आहे.
नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादीनेही दावा केला होता. त्यातच थेट केंद्र पातळीवरून छगन भुजबळ यांचे नाव पुढे आल्याने त्यास बळकटी मिळाली होती. भुजबळ तयारीला लागले होते; परंतु उमेदवाराच्या नावाची घोषणा होत नसल्याने ठराविक काळापर्यंत वाट पाहून भुजबळांनी माघारी घेतली. तरीही राष्ट्रवादीचा दावा होताच. अखेर बर्‍याच उशिराने ही जागा शिवसेनेला (शिंदे गट) सुटली अन राष्ट्रवादीच्या दाव्याची इतिश्री झाली. असे असले तरी जागा न मिळाल्याची सल नाही म्हणायला होतीच. शिवाय विश्वासात घेत नसल्याची राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील आमदारांची तक्रार होती. पदाधिकारी अन कार्यकर्त्यांनीही त्याबाबत री ओढलेली होती. या एकूणच पार्श्वभूमीवर महायुती धर्म निभावण्याचा फतवा निघाला अन सारे नाईलाजाने प्रचारात सक्रिय झाले. ही नाईलाजता कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या कारणांवरून निदर्शनास येत होती.
स्वतः भुजबळ प्रचारासाठी पुढे आले, त्यांचे सहकारी पुढे आले. त्यामुळे वरून तरी ऑल इज वेल दिसत होते. महायुतीच्या नाशिक व दिंडोरी या दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांच्या विजयासाठी राष्ट्रवादी सक्रिय झाल्याचे चित्र होते. तसे राष्ट्रवादीकडून अन महायुतीकडूनही वेळोवेळी स्पष्ट केले जात होते. असे असताना निवडणूक अखेरच्या टप्प्यात असताना तीन दिवस अगोदर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे नाशकात आले. त्यांनी प्रसारमाध्यमांशी राष्ट्रवादी भवनात संवाद साधला अन आता सारे संभ्रम, नाराजी दूर झाल्याचे सांगत ऑल इज वेल असल्याचे स्पष्ट केले. आमचे आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारात सक्रिय होते. आता तीन दिवसात ते अधिक सक्रिय होतील असे स्पष्ट केल्याने महायुतीतील काही मंडळींच्या भिवया उंचावल्या. अधिक सक्रिय व्हायला एवढा वेळ! तोही अगदी अखेरच्या तीन दिवसांत, अशी शंका उपस्थित केली गेली. किंबहुना तशी दबक्या आवाजात चर्चा होती.
शहर जिल्ह्यात महायुतीला चांगले वातावरण असताना केवळ जागेचा घोळ अन उमेदवारी जाहीर होण्याला झालेला विलंब महायुतीला गोतास काळ ठरण्याची शक्यता निर्माण झाली. शेवटच्या चरणात पंतप्रधान, मुख्यमंत्री व इतर नेत्यांच्या झालेल्या जाहीर सभांनी वातावरण निर्मितीचा झाला तरीही महायुतीला अनामिक धास्तीने ग्रासल्यासारखे वाटते. महायुती धर्म मनापासून तन्मयतेने निभावला गेला तरच ऑल इज वेल होईल अन्यथा नंतर एकमेकांवर खापर फोडण्याचे प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शेवटच्या दोन दिवसाचा प्रचार
भाजपसह राष्ट्रवादी महायुतीत ऑल इज वेल असल्याचा दावा करीत आहेत. किमान शेवट शेवट तरी म्हणे संभ्रम, नाराजी दूर झाल्याचे सांगितले जात आहे. याचा अर्थ नाराजीच्या फुटलेल्या फटाक्यांची धग अद्यापही होती. राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांना थेट नाशिक गाठून ऑल इज वेल असल्याची सांगण्याची वेळ आल्याने हा चर्चेचा विषय ठरला. नाराजी नसल्याचा निर्वाळा तसा राष्ट्रवादीचे हेविवेट भुजबळ यांनीही स्पष्ट केलेले होते. तरीही तटकरे यांनी केलेला नाशिक दौरा चर्चेचा विषय ठरला.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!