Homeताज्या बातम्यानिवडणूक लोकसभेची; चर्चा मात्र भुजबळांची

निवडणूक लोकसभेची; चर्चा मात्र भुजबळांची

नाशिक लोकल वृत्तसेवा
र्ी नाशिक : उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट आहे, असे रोकठोक वक्तव्य करणारे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा कानी पडताच भाजपचे संकटमोचक तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी थेट भुजबळ फार्म गाठले. निवडणूक जाहीर झाल्यापासून चर्चेचा केंद्रबिंदू नेहमीच स्वतःकडे ठेवणार्‍या भुजबळ यांच्याशी त्यांनी तब्बल दोन तास चर्चा केली.
लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने नाशिकची चर्चा संपूर्ण राज्यभर झाली. राजकारणात वजनदार व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे भुजबळ आणि त्यांचे भुजबळ फार्म राजकारणाचे जणू काही केंद्र बिंदूच ठरले. भाजपच्या शिरस्थ नेतृत्वानेच भुजबळ यांना उमेदवारी द्यावी निरोप धाडला अन शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीचा नूरच पालटून गेला. अन मग चर्चा सुरु झाली ती भुजबळ यांच्या उमेदवारीची! उमेदवारी जाहीर करण्यास विलंब होत असल्याने भुजबळ यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन उमेदवारीच्या शर्यतीतून जाहीर माघार घेतली. तेथून सुरु झाले नाराजी नाट्य. त्यांच्या समर्थकांनी थेट नाराजीचा सूर आळवल्याने भाजपेयींची धावपळ सुरु झाली. गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर अनेक भाजपच्या नेत्यांनी भुजबळ फार्मवर जाऊन पायधूळ झाडली. त्यातून भुजबळ यांचे मन वळविण्याचा प्रयत्नही झाला. नाराजी नाट्याचा हा अंक संपतो न संपतो तोच आमदार सुहास कांदे यांनी भुजबळ तुतारीच्या प्रचार करीत असल्याचा आरोप करून भाजपेयींना पुन्हा धावपळ करायला भाग पाडले.
पिंपळगावी पंतप्रधान यांच्या जाहीर सभेत भुजबळ यांनी जोरदार भाषण ठोकले तेव्हा कुठे भाजपेयींना हायसे वाटले. यावर थोडी उसंत घेत नाही तोच शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी भुजबळ नाराज असल्याचे वक्तव्य करून पुन्हा एकदा भाजपेयींना भुजबळ फार्मवर जाण्यास मजबूर केले. त्या दरम्यान भुजबळ यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना सहानुभूती असल्याचे वक्तव्य करून भाजपेयींना अस्वस्थ करून सोडले.
भुजबळ यांच्या मनात नेमके काय चालले याचा अंदाज घेण्यासाठीच बहुधा महाजन यांनी शुक्रवारी भुजबळ फार्म गाठले. भुजबळ आणि महाजन यांच्यात दोन तास चर्चा झाली. त्यानंतर भुजबळ यांच्या नाराजी वगैरे चा मुद्दा खोडून काढताना महाजन यांनी प्रचाराच्या रणनीतीचा मुलामा दिला. एकंदरीत संपूर्ण निवडणुकीच्या माहोलात भुजबळ हेच चर्चेच्या केंद्रस्थानीं राहिल्याची बाब अधोरेखित झाली.

महाजन-भुजबळ भेट
आम्ही एकत्र बसून रणनीतीवर चर्चा करीत होतो. काही लोकप्रतिनिधींना कॉल करून संपर्क करीत होतो, असे सांगून ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा धुडकावून लावली. दोन तास भुजबळ फार्मवर भुजबळांशी चर्चा केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!