नाशिक लोकल वृत्तसेवा
र्ीइगतपुरी : बारा जणांवर हल्ला करून जखमी करणारा तसेच एका अकरा वर्षाचा बालकाचा जीव घेणार्या बिबट्याला पकडण्यासाठी चार पिंजरे लावले. आठवडाभरानंतरही बिबट्या अजून पिंजर्यात अडकला नसून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
सात दिवसापुर्वी उंबरकोन येथील एका अकरा वर्षीय बालकावर बिबट्याने जीवहल्ला करून गंभीर जखमी केले होते. तर सहा वन कर्मचार्यांसह सहा ग्रामस्थांवर जीवघेणा हल्ला केला होता. तर हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रविण सारूक्ते या 11 वर्षीय मुलाला आपला जीव गमवावा लागला.
दरम्यान या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाच्या 130 अधिकारी कर्मचार्यांनी दिवस रात्र एक करीत शोध घेतला. मात्र अजूनही बिबट्या जाळ्यात अडकला नाही. यावेळी वनविभागाने श्वान पथक, ड्रोन कॅमेराव्दारे पुर्ण परिसर पिंजून काढत त्यांनी बिबट्या असलेल्या परिसरात फटाके फोडून पाहिले. मात्र बिबट्याची कोणतीही हालचाल आढळून आली नाही अथवा बिबट्या दिसला नाही. त्यामुळे वनविभागाने आजुबाजूच्या गावातील परिसरही पिंजून काढत होता. घटनास्थळी चार ठिकाणी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावलेले आहेत. मात्र अद्यापही बिबट्या पिंजर्यात अडकलेला नाही.
बिबट्या मागे धावू नका
बिबट्या गेल्या सात दिवसांपासून उपाशी असून तो इकडे तिकडे फिरत आहे. त्यामुळे तो चवतळला असून गावातील कोणत्याही नागरिकांनी त्याच्यामागे दगड अथवा काठ्या घेऊन मागे धावू नये. त्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्यास अडचणी येणार असून गावातील सर्व नागरिकांनी वन विभागाला सहकार्य करावे असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांनी केले आहे. तसेच बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यु झालेल्या प्रविण सारुक्ते या 11 वर्षीय मुलाच्या कुटुंबाला शासनाकडून मदत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही बिरारीस यांनी सांगितले.