सतीश रुपवते
नाशिक लोकल : लाच स्वीकारताना जलसंधारण अधिकारी रंगेहात अटक; एसीबीची मोठी कारवाई जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागातील जलसंधारण अधिकारी वैशाली ठाकरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात अटक केली आहे. ₹५०,००० लाच स्वीकारताना त्या एसीबीच्या सापळ्यात अडकल्या. या घटनेमुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकरणात काम करून देण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडून लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर एसीबीने सापळा रचून त्यांना लाच स्वीकारताना पकडले. अटकेनंतर एसीबीच्या पथकाने त्यांना त्यांच्या कार्यालयातून ताब्यात घेतले असून सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, गेल्या पंधरवड्यात एसीबीने केलेली ही दुसरी मोठी कारवाई ठरली आहे. यापूर्वी जीएसटी विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला ₹२० लाखांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली होती. या सलग कारवायांमुळे भ्रष्टाचाराविरोधात एसीबीने कडक भूमिका घेतल्याचे स्पष्ट होत आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.