नाशिक : वार्ताहर
बेमोसमी पावसाने झालेल्या नुकसानीचे जलद गतीने पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची
मागणी स्वराज्य संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
गेल्या दोन दिवसापासून नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध भागात बेमोसमी पाऊस झाल्याने शेतकर्यांच्या उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या आधीच हलाखीत असलेला शेतकरी पूर्णतः उध्वस्त झाला आहे. एका बाजूला शेती फुलावी यासाठी आराधना करणाऱ्या ऐन होळीच्या दिवशीच सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे तयार झालेले . द्राक्ष, गहू , कांदा, हरभरा, टोमॅटो या सर्वच पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतात उभी असलेली पिकं झोपली आहेत.पुढील तीन दिवसांपर्यंत अशाच प्रकारे पाऊस पडत राहण्याची शक्यता वर्तवली जात असल्या मुळे शेतकरी बांधवांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. जोरदार वारा आणि तुफानी पाऊस यामुळे अनेक ठिकाणी कापणीला आलेल्या गव्हाचे पीक आडवे पडल्याचे दिसून येत आहे. हजारो शेतकऱ्यांचे विक्रीला आलेले द्राक्षाचे पीक देखील संकटात सापडले असून बागायतदारांची वर्षभराची मेहनत एका तडाख्यात नष्ट झालीआहे. कडक उन्हाचा चटका बसून द्राक्षांची गुणवत्ता ढासळू नये यासाठी द्राक्ष घडाना खूप मोठा खर्च करून कागदाचे आवरण चढवावे लागते. शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे तर एकूण जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे शेकडो कोटींचे नुकसान झाले आहे. मालातील दर घसरणीमुळे आधीच बळीराजा मेटाकुटीला आलेला असताना आता या अस्मानी संकटांनीही बळीराजाच्या तोंड चा आलेला घास फिरवण्याचे काम केले आहे . राज्य सरकार व केंद्र सरकारची प्राथमिक असल्याने सरकारने या शेतकऱ्यांना सहानुभूती दाखवून नुकसान भरपाई दयावी. त्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा प्रशासनाने अशा अवकाळी पावसाने नुकसान केलेल्या क्षेत्राचे तातडीने पंचनामे करणे गरजेचे आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री आपण एकूण परिस्थिती लक्षात घेऊन तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश तातडीने द्यावेत ही विनंती. अन्यथा शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजी महाराज यांच्या मार्गदर्शनात स्वराज्य संघटना महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडेल संतप्त शेतकऱ्यांच्या संतापातून होणाऱ्या परिणामांची जबाबदारी ही सरकारवर राहील. असे आवाहान स्वराज्य संघटना महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख
करण गायकर यांनी केले आहे.