प्रमोद रहाणे l देवळाली कॅम्प :
वयाची साठ वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र सरकार वयोश्री योजना राबविणार आहे. त्या अंतर्गत साठ वर्षांपुढील ज्येष्ठांना प्रति महिना तीन हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेचा लाभ ज्येष्ठ नागरिकांना मिळवून देण्यासाठी तसेच भगूर परिसर ज्येष्ठ नागरिक भवनाच्या वाढीव बांधकामासाठी आपण प्रयत्नशील आहोत अशी ग्वाही खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.
भगुर परिसर ज्येष्ठ नागरिक संघाच्या मेळाव्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. ज्येष्ठ नागरिक भवनात बुधवारी सकाळी साडेदहा वाजेला झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष दादासाहेब देशमुख तर प्रमुख अतिथी म्हणून खासदार हेमंत गोडसे, देवळाली छावणी परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तानाजी करंजकर, युवा व्याख्याती कुमारी श्रुती करंजकर, पत्रकार संघाचे सरचिटणीस प्रमोद रहाणे आदी उपस्थित होते.
प्रार्थना आणि महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. इतीवृत्ताचे वाचन कचेश्वर मोरे तर अहवाल सादरीकरण किशोर चव्हाण यांनी केले.
या प्रसंगी संघाचे देणगीदार, तसेच ज्यांचे वाढदिवस आहेत ते सदस्य आणि नविन सभासदांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तानाजी करंजकर, प्रमोद रहाणे, कु. श्रुती करंजकर यांची समयोचीत भाषण झाले. अध्यक्षीय भाषणात दादासाहेब देशमुख यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या अडी,अडचणी, समस्या, मागण्या, रेल्वे प्रवास भाड्यात सूट, देवळाली स्थानकावर रेल्वे गाड्यांना थांबे, रस्त्याची सुधारणा, सभागृहाचे विस्तारीकरण या विषयी उहापोह केला. त्याला खा. गोडसे यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून आपल्या कारकीर्दीचा आढावा मांडला. केंद्र तसेच राज्य सरकारच्या योजना, उपक्रमांची माहिती दिली. त्यानंतर संघाचे इतर उपक्रम पार पडले. दिवंगत सभासदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पसायदान, राष्ट्रगीत, आणि राज्य गीताने मेळाव्याचा समारोप झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायणराव आडके तर आभार प्रदर्शन शिवाजीराव घोरपडे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी काशिनाथ उबाळे, खंडेराव गायकवाड, सदाशिव सांबरे, मारुती कोरडे, पांडुरंग शिरसाट, अंबादास पाटील, देवराम मुठाळ, किरण बेदरकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास रमेश भूषणवार, नथुलाल परदेशी, रमेश देशमुख, रमेश फडोळ, अंबादास देशमुख, हेमलाल मराठे, रमापती चव्हाण, अनंत कापसे, राजकमल राठोड, बहीरू करंजकर, ज्ञानेश्वर कुंडारिया, शरद गायकवाड, विठ्ठल काळे, रत्नाकर बकरे, शिवाजी सोनवणे आदींसह सदस्य उपस्थित होते.