सटाणा प्रतिनिधी:
तालुक्यातील शाळांनी ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान’ प्रभावीपणे राबवून विद्यार्थ्यांप्रती असलेली राज्य शासनाची तळमळ मुख्याध्यापक , शिक्षकांनी विद्यार्थ्यांसह पालकांपर्यंत पोहोचवावी. शाळांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जोरदार प्रयत्न करावे,असे आवाहन आमदार दिलीप बोरसे यांनी केले.
डिव्हाईन इंग्लिश मीडियम स्कूलच्या हॉलमध्ये महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाच्या संयुक्त विद्यमाने बागलाण पंचायत समिती शिक्षण विभाग आयोजित मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शन शिबिरामध्ये आमदार बोरसे बोलत होते.
गटशिक्षणाधिकारी चित्रा देवरे,शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार,केंद्रप्रमुख हिरालाल बधान,कपालेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंकज ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यातील सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनांच्या शाळांकरिता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान राबविण्यात येत असुन अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याबरोबरच शिक्षणासाठी अत्याधुनिक ज्ञान-तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देणे,हा प्रमुख उद्देश आहे. अभियानात यशस्वी ठरणाऱ्या शाळेसाठी राज्यस्तरीय पहिले पारितोषिक ५१ लाख रुपये असून दुसरे २१ लाख ,तिसरे ११ लाख रुपये आहे. अभियानासाठी राज्य मंत्रिमंडळाने संपूर्ण राज्यभरात जवळपास २० कोटी ६३ लाख रुपये खर्चास मान्यता दिली असून अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी शिक्षक , विद्यार्थ्यांच्या संवाद सत्रांचेदेखील आयोजन करण्यात येत आहे.त्याचअनुषंगाने बागलाण तालुक्यात मुख्याध्यापकांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महत्त्वपूर्ण मार्गदर्शन शिबिरामध्ये तालुक्यातील दोनशेहून अधिक मुख्याध्यापक सहभागी झाले आहेत.