HomeUncategorizedगेल्या वर्षी होते अवघे 22 आता थेट 294 पाणीपुरवठा करणार्‍या टँकरची संख्या...

गेल्या वर्षी होते अवघे 22 आता थेट 294 पाणीपुरवठा करणार्‍या टँकरची संख्या अनेक पटीने वाढली

नाशिक
ग्रामीण भागातील ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याच्या तहान भागविण्यासाठी गेल्या वर्षी 3 मे रोजी अवघे 22 टँकर धावत होते. यावर्षी एप्रिलच्या अखेरच्या दिवशी टँकरची हीच संख्या तब्बल 294 वर जाऊन पोहचल्याने जिल्ह्यातील पाणीटंचाईची दाहकता समोर आली आहे.
तापमानाचा पारा चाळीशीपार गेला असून रणरणत्या उन्हाने नाशिककर हैराण झाले आहेत. त्यातच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाईही जाणवत आहे. विहिरींनी तळ गाठला असून नद्या -नाल्या कोरड्याठाक पडल्या आहेत. प्रमुख धरणांमधील पाणीसाठाही दिवसेंदिवस कमी होत आहे. हंडाभर पिण्याचे पाणी शोधण्यासाठी दर्‍या-खोर्‍यात जावे लागत असल्याचे भीषण चित्र दिसून येत आहे. प्रशासनाने ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची तहान भागविण्यासाठी टँकरची मात्रा शोधली आहे. गेल्या वर्षी म्हणजे 3 मे रोजी जिल्ह्यात केवळ 22 टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. म्हणजे, टंचाईची तीव्रता फारशी जाणवली नाही. त्यावेळी तहानलेली गावे 29 तर वाड्यांची संख्या 10 होती. यावर्षी तहानलेली गावे-वाड्या आणि त्यांना पाणीपुरवठा करणार्‍या टँकरच्या संख्या कित्येक पटीने वाढ झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार 30 एप्रिल 2024 ला 287 गावे आणि 671 वाड्या तहानलेल्या आहेत. तेथील ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची तहान भागविण्यासाठी तब्बल 294 टँकर धावत आहेत. 5 एप्रिलला टँकरची संख्या 214 होती. म्हणजे पंचवीस दिवसातच 80 टँकर वाढले आहेत. जिल्ह्यात नांदगाव तालुक्यात भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. 340 गावे-वाड्यांना 69 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्याखालोखाल सिन्नर तालुक्यात 159 गावे -वाड्यांना 26 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यानंतर मालेगाव तालुक्यात 127 गावे-वाड्यांना 36 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. चांदवड तालुक्यात 93 गावे-वाड्या तहानलेल्या असून 31 टँकर ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची तहान भागवित आहेत. तसेच येवला तालुक्यात 79 गावे-वाड्यांची तहान 47 टँकर भागवित आहेत. देवळा तालुक्यात 62 गावे-वाड्यांची तहान 32 टँकर भागवित आहेत. कळवण तालुक्यात 15 गावे-वाड्या तहानलेल्या असून याठिकाणी एकही टँकर सुरू नाही. पेठ तालुक्यातील 30 गावे-वाड्यांची तहान आठ टँकर भागवित आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!