Homeताज्या बातम्याडॉ. भामरेही भुजबळ फार्मवर जावून झाडून आले पायधूळ!

डॉ. भामरेही भुजबळ फार्मवर जावून झाडून आले पायधूळ!

नाशिक लोकल वृत्तसेवा
नाशिक : यावेळच्या लोकसभा निवडणुकीत राजकीय दृष्ट्या भुजबळ फार्मला कमालीचे महत्व प्राप्त झाले असून मंत्र्यांपाठोपाठ आता धुळे मतदारसंघाचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे हेही भुजबळ फार्मची पायधूळ झाडून आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ राजकारणातील एक वजनदार नेतृत्व मानले जातात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेले भुजबळ यांनी कोणत्याही संकटाला धैर्याने आणि आक्रमतेने तोंड दिले आहे. आरक्षणाच्या मुद्यावरून सर्वच पक्षांचे राजकीय नेते मनोज जरांगे यांच्याविरोधात बोलणे तर दूरच पण, त्यांच्यापासून अंतर राख ून असताना भुजबळ यांनी मात्र उघडपणे मैदानात उतरणे पसंत केले. त्यानंतर हळूहळू जरांगे यांच्याविरोधात बोलण्यासाठी राजकीय नेते सरसावले. सुरूवात मात्र भुजबळ यांनी केलेली असल्याने त्यावेळी त्यांचे महत्वही अधोरेखित होऊन गेले. त्यामुळेच की काय कधी काळी भुजबळ यांचा दुस्वास करणार्‍या भाजपेयींना आता भुजबळ आपलेसे वाटू लागले आहेत.
ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह स्थानिक भाजपेयींनी भुजबळ फार्मवर हजेरी लावली. हंगाम निवडणुकीचा असल्याने आणि त्यात भुजबळ हे महायुतीचा घटक असल्याने भाजपेयींची तशी कृती असणे स्वाभाविक आहे. स्वत: भुजबळ हे नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. पण, ऐनवेळी हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात आली. तेव्हा भुजबळ नाराज असतील आणि त्यांच्या नाराजीचा फटका बसू नये म्हणून महाजनांसह अन्य भाजप नेत्यांनी त्यांची भेट घेणे ओघाने आलेच. मात्र धुळे मतदारसंघ आणि भुजबळ यांचा तसा काही संबंध नसताना याठिकाणी रिंगणात उतरलेले भाजपचे उमेदवार डॉ.भामरे हेही मंगळवारी भुजबळ फार्मवर येऊन पायधुळ झाडून गेले आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भुजबळ यांचा मतदारसंघ येवला तर असून लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी ते नाशिक मतदारसंघातून इच्छुक होते. त्यामुळे भामरे यांना भुजबळांना भ्यायचे कारणच नाही. तरीही त्यांनी भुजबळ फार्मवर येऊन भुजबळ यांची भेट घेतली. बराच वेळ चर्चा केल्याने त्यास महत्व प्राप्त झाले आहे. भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून नेहमीच आक्रमक भुमिका घेतली आहे. त्यामुळे ते केवळ राज्यातच नाही तर राज्याबाहेरही ओबीसींचा नेता म्हणून ओळखले जातात. बहुधा हीच बाब हेरून भुजबळ यांची धुळे मतदारसंघात मदत व्हावी म्हणूनच भामरे यांनी त्यांची भेट घेतली असावी, असा अंदाज बांधला जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!