इगतपुरी: तालुक्यातील उंबरकोन येथे तीन दिवसापूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रविण सारूक्ते या ११ वर्षीय मुलाची आज मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. शनिवारी दुपारी ५ वाजेच्या सुमारास त्याची प्राण ज्योत मालवली. नाशिक येथील सह्याद्री रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाच्या १३० अधिकारी कर्मचाऱ्यांनी दिवस रात्र एक करीत शोध घेतला. मात्र अजूनही बिबट्या जाळ्यात अडकला नाही. शुक्रवारी मध्यरात्री ३ वाजेपर्यंत वनविभागाने संपूर्ण परिसर पिंजून काढला मात्र यश आले नाही. तर शनिवारी सकाळपासून वनविभागाने श्वान पथक, ड्रोन कॅमेराव्दारे पूर्ण परिसर पिंजून काढत त्यांनी बिबट्या असलेल्या परिसरात फटाके फोडून पाहिले. मात्र बिबट्याची कोणतीही हालचाल आढळून आली नाही अथवा बिबट्या दिसला नाही. त्यामुळे वनविभाग आजूबाजूच्या गावातील परिसरही पिंजून काढत आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांनी आवाहन केले आहे की, बिबट्या हा गेल्या तीन दिवसांपासून उपाशी असून तो इकडे तिकडे फिरत आहे. त्यामुळे तो चवतळला असून गावातील कोणत्याही नागरिकांनी त्याच्यामागे दगड अथवा काठ्या घेऊन मागे धावू नये. त्यामुळे बिबट्याला जेर बंद करण्यास अडचणी येणार असून गावातील सर्व नागरिकांनी वन विभागाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
दरम्यान अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष लकी जाधव यांनी मयत मुलाच्या घरी भेट देऊन कुटुंबाची सांत्वन पर भेट घेत त्यांना शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तसेच त्यांनी गावातील नागरिकांनी जंगलात जाऊन आग लावु नये, नागरिकांनी बिबट्याच्या मागे दगड घेऊन धावू नये व बिबट्याला जखमी करू नये आणि वन विभागाला सर्वतोपरी सहकार्य करावे जेणेकरून बिबट्या लवकरच जेरबंद होईल व आपला परिसर भाई मुक्त होईल असे आवाहनही त्यांनी केले आहे.