लासलगाव: लासलगावसह लाभार्थी गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप लाईन लिकेज आणि नांदूरमध्यमेश्वर धरण कोरडे अश्या अनेक समस्येने गेल्या 20 ते 22 दिवसांपासून लासलगावकर पाण्यापासून वंचित होते याच्या निषेधार्थ आज समस्त लासलगाव मधील व्यवसायिकांनी उत्स्फूर्तपणे आपापली आस्थापने बंद ठेवत प्रशासनाचा निषेध केला.
पाईपलाईन लिकेज, मोटार नादुरुस्ती होणे, वीज पुरवठा खंडित व धरणाने गाठलेला तळ या विविध समस्यामुळे लासलगावकरांना अनेक दिवसापासून पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते. लहान लहान मुले महिला व पुरुष वर्ग आपले काम धंदे सोडून हंडाभर पाण्यासाठी वणवण करताना दिसत होते. लासलगाव व परिसरातील नेतेमंडळी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये मग्न असून सर्व सामान्य नागरिक मात्र स्वता:च्या पाणी प्रश्नासाठी लढतांना दिसत आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी लोकसभा मतदानावर बहिष्कार व लासलगाव बंदची हाक दिल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. लासलगाव ग्रामपंचायत कार्यालयमध्ये गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांनी बैठक घेतली यानंतर दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेतली मात्र या दोन्ही बैठकीत कुठलाही तोडगा न निघाल्याने समस्त लासलगावकरांनी बंदची हाक देत आपला रोष व्यक्त केला. यानंतर प्रशासन खडबडून जागे होत तात्काळ उपयोजना करून वालदेवी मुकणे व दारणातून पाणी सोडून लासलगावला पाणीपुरवठा करणाऱ्या नांदूर मध्यमेश्वर धरणात पाणी सोडले.
प्रतिक्रिया -दत्ता पाटील,लासलगाव
पाणी प्रश्नाच्या निषेधार्थ आम्ही लासलगाव शहर समिती व नागरिक लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकत आहे.
प्रतिक्रिया विकास कोल्हे, ग्रामस्थ
चुकीच्या नियोजनाचा फटका हा लासलगाव व येथील रहिवाशांना बसत आहे याच्याच निषेधार्थ आम्ही निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार करून मतदानावर बहिष्कार टाकला आहे. १७ कोटी रुपये खर्च केलेली पाईपलाईन अवघ्या सहा महिन्यात फुटत असल्याने याची चौकशी व्हावी.