Satish Rupwate
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना सोमवारी तातडीने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. छातीत कफ झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. उपचारांना चांगला प्रतिसाद मिळत असून आज किंवा उद्या संध्याकाळपर्यंत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी त्यांना दूरध्वनी केला. यावेळी मोदींनी पवारांच्या प्रकृतीबाबत चौकशी करत लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
रुबी हॉल क्लिनिककडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांच्या प्रकृतीत सातत्याने सुधारणा होत आहे. डॉक्टर सायमन ग्रँट यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून उपचारांमुळे त्रास कमी झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, डॉक्टर अभिजीत लोढा यांनी सांगितले की, शरद पवार यांना काही दिवसांपासून कफ आणि खोकल्याचा त्रास जाणवत होता. शारीरिक परिश्रम आणि सततच्या दौऱ्यांमुळे थकवा जाणवत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ऑक्सिजन पातळी, रक्तदाब आणि सॅच्युरेशन नॉर्मल असून काळजी करण्यासारखे काही नाही. ते आयसीयूत नसून खासगी खोलीत उपचार घेत आहेत. व्हेंटिलेटरची आवश्यकता भासलेली नाही.
याबाबत आमदार रोहित पवार यांनी कार्यकर्ते व हितचिंतकांना रुग्णालयात गर्दी करू नये, असे आवाहन केले आहे. “पवारांची प्रकृती नॉर्मल आहे. ते आयसीयूत नसून खासगी रुममध्ये आहेत. इतर रुग्णांच्या हितासाठी रुग्णालयाचा प्रोटोकॉल पाळावा,” असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, पुढील एक-दोन दिवसांत तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील उपचारांबाबत निर्णय घेतला जाणार असून, डिस्चार्जनंतर खासगी वाहनाने त्यांना मुंबईला नेण्यात येण्याची शक्यता आहे.