Homeनाशिक महानगरपालिकागोदाघाटावर भीममय वातावरण; काळाराम सत्याग्रहींना भावपूर्ण अभिवादन

गोदाघाटावर भीममय वातावरण; काळाराम सत्याग्रहींना भावपूर्ण अभिवादन

पंचवटी (वा.) भूमिपुत्र सत्याग्रह स्मारक समिती, नाशिक जिल्हा यांच्या वतीने गोदाघाटावर आयोजित अभिवादन सभा व सांस्कृतिक कार्यक्रम सोमवार (दि. २) रोजी उत्साहात पार पडला. काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहींना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने महिला-पुरुष उपस्थित राहिले. गोदातीरी परिसर ‘जय भीम’च्या घोषणांनी दुमदुमून गेला आणि अक्षरशः भीममय वातावरण निर्माण झाले.

सायंकाळी पाच वाजेपासून ते रात्री दहा वाजेपर्यंत गोदा घाटावरील गौरी पटांगणावर भीम अनुयायांची प्रचंड गर्दी उसळली होती. महिला-पुरुष, तरुण-तरुणींसह अबालवृद्धांनीही कार्यक्रमास मोठ्या संख्येने हजेरी लावली. त्यामुळे गोदाघाट परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक साजन बेंद्रे यांनी त्यांच्या नवीन येऊ घातलेल्या गीताच्या काही ओळी सादर करताच उपस्थितांनी मोबाईलचे टॉर्च लाईट सुरू करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाला नाशिकचे माजी महापौर अशोक दिवे, आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब कटारे, कार्यक्रमाचे अध्यक्ष नारायण गायकवाड, कार्याध्यक्ष आदेश पगारे, स्वागताध्यक्ष दामोदर पगारे, सूत्रसंचालक बाळासाहेब शिंदे, भारतीय बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष संदेश पगारे, आरपीआय चळवळीचे ज्येष्ठ नेते दीपचंद दोंदे, मुख्य निमंत्रक कैलास तेलोरे व बिपीन कटारे, महेश पगारे, रामेश्वर साबळे, राहुल जाधव, कविता तेजाळे, आकाश भालेराव, अर्जुन पगारे आदी मान्यवर उपस्थित होते.

भीमगीतांचा सुरेल नजराणा – कार्यक्रमात गायक वर्षा एखंडे, साजन बेंद्रे आणि विशाल चव्हाण यांनी नव्या-जुन्या मराठी व हिंदी भीमगीतांची दमदार सादरीकरणे केली. “व्हीआयपी राहणं व्हीआयपी खान, व्हीआयपी मान-सन्मान, बाबासाहेबान दिलय…”, “मी शिपाई आंबेडकर घराण्याचा, वारस मी भीमरावाच्या विचाराचा…”, “निळा झेंडा फडकतो आभाळी”, “भीम जन्माला आला गगन दणाणले”, “जय भीम बोल रे सजना”, तसेच “हम भीम के दीवाने हैं” यांसारख्या गीतांनी उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळवली. प्रत्येक सादरीकरणानंतर टाळ्यांचा कडकडाट आणि जयघोषांनी परिसर भारावून गेला.

वाद्यवृंदात ऋषिकेश त्रिभुवन, आशीर्वाद कांबळे व लकी कांबळे (ढोलकी), राजेश सागर (तबला) तसेच आवेज कुरेशी, ओमकार वाघमारे, सोहेल कुरेशी, मयूर वाल्मिकी यांनी बँजोच्या तालावर गायकांना संगीत साथ दिली. संगीताच्या ठेक्यावर अनेकांनी जागेवरच ठेका धरत कार्यक्रमाचा आनंद लुटला.

समता-बंधुत्वाचा संदेश – या अभिवादन सभेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांना उजाळा देण्यात आला. भावपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाने काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या स्मृतींना उजाळा देत सामाजिक ऐक्याचा ठोस संदेश दिला.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!