Homeनाशिक लोकलनाशिक मध्ये वाढती दुरावाः खरी समस्या द्वेष नाही, संवादाचा अभाव आहे

नाशिक मध्ये वाढती दुरावाः खरी समस्या द्वेष नाही, संवादाचा अभाव आहे

*नाशिक मध्ये वाढती दुरावाः खरी समस्या द्वेष नाही, संवादाचा अभाव आह*

आज आपल्या शहरात हिंदू आणि मुस्लिम समाजामधील वाढती दरी स्पष्टपणे दिसत आहे. पण या दुराव्याची खरी कारणं द्वेष नाहीत, तर एकमेकांपासून दूर होणं आणि संवाद कमी होणं हे आहे.

एक काळ असा होता की आपण सगळे एकाच मोहल्ल्यात, एकाच परिसरात शेजारीपाजारी राहायचो. नाती केवळ नावापुरती नव्हती, तर मनाने जोडलेली होती. मुस्लिम कुटुंबावर एखादी अडचण आली तर हिंदू बांधव मदतीला धावून यायचे. आणि हिंदू कुटुंबावर संकट आलं तर मुस्लिम बांधव खांद्याला खांदा लावून उभे राहत. आजारपण असो, लग्नसमारंभ असो किंवा घरात दुःखद प्रसंग — प्रत्येक ठिकाणी माणुसकी आधी दिसायची, धर्म नंतर.;एखादा मोठा वाद किंवा तणाव निर्माण झाला तर दोन्ही समाज मिळून तो सोडवण्याचा प्रयत्न करायचे. फार कमी प्रकरणे कोर्टापर्यंत जायची. अनेक वेळा पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही बाजूंना समोर बसवून प्रश्न मिटवले जायचे. समजावून सांगूनही ऐकलं नाही तर कायद्याचा धाक दाखवूनही शांतता प्रस्थापित केली जायची — पण उद्देश नेहमी शांतता राखण्याचाच असायचा. पण आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. छोट्या छोट्या कारणांवरून तरुणांमध्ये आक्रमकता दिसत आहे. किरकोळ गोष्टींना मोठा वादाचा रंग दिला जातो. प्रत्येक प्रश्नाला हिंदू-मुस्लिम असा रंग देऊन सामाजिक ऐक्याला तडा दिला जात आहे. सर्वात दुर्दैवाची बाब म्हणजे समाजाचे मार्गदर्शक असलेले अनेक ज्येष्ठ आज शांत बसून हे सर्व पाहत आहेत.

या परिस्थितीचं मूळ कारण म्हणजे *संवादाचा अभाव (Communication Gap)*. दोन्ही समाजांमधील भेटीगाठी कमी झाल्या, चर्चा थांबल्या, विश्वास कमी झाला… आणि याचा सर्वात मोठा फटका नव्या पिढीला बसत आहे. जी तरुण पिढी एकमेकांना न समजता मोठी होत आहे, त्यांच्या मनात गैरसमज आणि दुरावा वाढत आहे. त्याचा परिणाम पुढच्या लहान पिढीवर आणखी गंभीर होणार आहे.

या परिस्थितीसाठी प्रशासनाचीही काही अंशी जबाबदारी आहे. पूर्वी प्रत्येक सण किंवा सामाजिक प्रश्नाच्या आधी *शांतता समितीच्या बैठकां* घेतल्या जात. दोन्ही समाजाचे प्रतिनिधी एकत्र बसून चर्चा करत आणि कठीण प्रश्नांवर सामंजस्याने तोडगा काढत. या बैठकींमुळे विश्वास टिकून राहायचा आणि तणाव वाढण्याआधीच कमी व्हायचा. आज ना त्या बैठकांचा मागमूस आहे, ना वातावरण शांत होण्याची चिन्हे दिसत आहेत.

तसेच दोन्ही समाजातील अनेक ज्येष्ठ, ज्यांच्याकडे अनुभव आणि समज आहे, तेही शांत बसले आहेत. समाज तेव्हाच विस्कळीत होतो जेव्हा शहाणे लोक बोलणं थांबवतात.

आज गरज नव्या कायद्यांची नाही, तर जुन्या नात्यांना पुन्हा जिवंत करण्याची आहे.गरज आहे पुन्हा भेटण्याची, एकत्र बसण्याची, एकमेकांचं ऐकण्याची आणि माणुसकीला धर्मापेक्षा वर स्थान देण्याची. कारण सत्य हेच आहे.

*दुरावा द्वेषामुळे नाही, तर शांततेमुळे निर्माण होतो… आणि शांतता परत येते ती संवादातूनच.*

*फहीम शेख*

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!