प्रमोद रहाणे l देवळाली कॅम्प
भगुर नगर परिषदेतील पाणीपुरवठा व एसटीपी प्लांटचा प्रस्ताव प्रलंबित ठेवणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी नाशिकरोड-देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सरोजा आहिरे यांनी विधिमंडळात औचित्याचा मुद्दा उपस्थित करून केली.
भगूर नगरपरिषदेसाठी नवीन पाणी पुरवठा योजना व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प उभारणी करण्यासाठी भगूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता अथवा प्रशासन हे जाणीवपुर्वक प्रस्तावास व तांत्रिक कारणांसाठी कार्यवाही प्रलंबित करुन दिरंगाई करत आहेत. त्यामुळे त्यांना दोषी ठरवून दोषींवर कारवाई करण्यासाठी आ. सरोज आहिरे यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात औचित्याचा मुद्दा उपस्थित केला.
नागपूर येथे सुरु असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात देवळालीच्या आमदार सरोज आहिरे यांनी सोमवारी दि १८ रोजी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मस्थान असलेल्या भगूरला शुद्ध पाणी मिळावे, व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प व्हावा यासाठी अत्याधुनिक प्रस्ताव तयार करावे. यासाठी आ. आहिरेनी संबंधित विषयावर वारंवार पत्रव्यवहार व पाठपुरावा केला. त्यासाठी दि २१ जून २०२२ रोजी मुख्याधिकारी व मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या सोबत झालेल्या बैठकीला दीड वर्षे कालावधी उलटला. असे असतांनाही प्राधिकरणाकडे कोणताही प्रस्ताव या दोन्ही विभागाकडून तयार करुन पोहचविला जात नाही. त्याचबरोबर सदर प्रस्तावासाठीची तांत्रिक तपासणी फी भरण्याची मुदत संपलेली आहे. पाठपुरावा करुनही सदर फी भरली जात नाही. भगूर नगर परिषदेची लोकसंख्या २० हजारापेक्षा अधिक आहे. या शहरातील सांडपाणी दारणा नदीत पात्रात मिसळत आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना आरोग्याचा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे पाणी पुरवठा योजना व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प अत्याधुनिक होणे आवश्यक आहे. अशी भूमिका आ. आहिरेनी विधिमंडळ सभागृहात मांडली. तसेच प्रकल्प उभारणीचा सदर प्रस्ताव प्रलंबित ठेवण्यासाठी कारणीभूत असलेल्या संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी देवळालीच्या आमदार आ. सरोज आहिरे यांनी नागपूर अधिवेशनात विधिमंडळात औचित्याचा मुद्दा उपस्थित करून केली आहे.