नाशिक । प्रतिनिधी :
२७व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे नाशिक शहरात आयोजन होत असून या महोत्सवाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या दि. १२ जानेवारी रोजी नाशिक दौर्यावर येणार असल्याने प्रशासनाकडून मोदींच्या स्वागताची आणि राष्ट्रीय युवा महोत्सवाची जोरदार तयारी करण्यात येत आहे. (PM Modi is in Nashik)
या महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री अनुराग ठाकूर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्य मंत्रीमंडळातील वरिष्ठ मंत्री उपस्थित राहणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शहरातील रस्ते, दुभाजक, चौक, झाडे, पेव्हर ब्लॉक यांची डागडुजी व रंगरंगोटी करण्यात येत आहेत. तर मोदी ओझर विमानतळावरून ज्या रस्त्याने तपोवन मैदानात कार्यक्रम स्थळी जाणार आहेत त्या रस्त्यांची दुरूस्ती व डांबरीकरण करण्यात येत आहे.
या महोत्सवात दि. २८ राज्ये व ८ केंद्रशासित प्रदेशामधील युवा चमू, राष्ट्रीय सेवा योजना, नेहरू युवा केंद्र संघटना यांचे स्वयंसेवक, परिक्षक व इतर मंत्रालय अधिकारी व कर्मचारी असे साधारण आठ हजार युवक सहभागी होणार आहेत. या महोत्सवाचे यशस्वी आयोजन व्हावे, यासाठी क्रीडामंत्री संजय बनसोडे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन तसेच पालकमंत्री दादा भुसे यांनी वेळोवेळी आढावा बैठका घेतल्या आहेत.
दरम्यान, दुभाजकांमधील झाडांना आकर्षक रंग देऊन सजवण्यात येत आहे. तसेच वाहतूक बेटांचेही सुशोभीकरण करण्यात येत आहेत. तसेच रस्त्यालगतच्या कचर्याचीही साफसफाई करत शहर स्वच्छ केले जात आहे. पंतप्रधान मोदींच्या दौर्याच्या पार्श्वभूमीवर शहराची नव्याने सजावट करण्यात येत असल्याचे चित्र आहे. पंतप्रधान मोदी २०१९ साली लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गोल्फ क्लब येथे झालेल्या सभेला संबोधित करण्यासाठी आले होते. त्यानंतर हा दौरा होत असल्याने जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन यांच्याकडून युद्धपाळीवर तयारी करण्यात येत आहे.
शहर लागले सजू…
महोत्सवाच्या निमित्ताने देशभरात नाशिकला स्वत:चे ब्रॅण्डिंग करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे महापालिकेकडून जय्यत तयारी केली जात आहे. महापालिकेतर्फे शहरभरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. सर्व विभागीय कार्यालयांच्या क्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, चौक, मोकळे भूखंड, क्रीडांगणे, नाले व नदीकिनारे इत्यादी ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. रस्ते, सार्वजनिक ठिकाणांसोबत सहाही विभागांतील वाहतूक बेट, रस्त्यांमधील दुभाजक व फुटपाथची स्वच्छता कर्मचार्यांकडून करण्यात येत आहे.