प्रमोद रहाणे l देवळाली कॅम्प:- शिक्षण मंडळ भगूर संचलित श्री. एकनाथराव सहादू शेटे कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंडळ आयोजित निर्भय कन्या अभियान, दोन दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.
कार्यशाळेत दिनांक २३ जानेवारी २०२४ रोजी प्रा. पूनम रेस्वाल यांनी विद्यार्थिनींसाठी असलेले शिक्षणाचे महत्त्व, स्वावलंबी जीवन, आजच्या काळात बदलती तरुणींची जीवनशैली यासंबंधी मनोगत व्यक्त केले. बुधवार दि. २४ जानेवारी रोजी कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या व शिक्षण मंडळ भगूर संस्थेच्या कार्यकारिणी सदस्या डॉ. हेमांगी पाटील उपस्थित होत्या. या प्रसंगी त्यांनी विद्यार्थिनींना मानसिक तसेच शारीरिक आरोग्य कसे सांभाळायचे हे वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून समजावून सांगितले. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या ॲड. प्राजक्ता कुलकर्णी यांनी विद्यार्थिनींना सायबर व इतर महिलांविषयक कायदे याबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यानंतर महिला पोलीस कॉन्स्टेबल सरला खैरनार यांनी महिला सक्षमीकरण व सशक्तिकरण या विषयावर भाष्य केले. तसेच आपल्या दैनंदिन जीवनातील वेगवेगळ्या अनुभवांतून महाविद्यालयीन विद्यार्थिनींना सायबर गुन्हे बद्दल सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विभाग प्रमुख तसेच शिक्षण मंडळ भगूर संस्थेचे कार्यकारणी सदस्य मृत्युंजय कापसे होते. त्यांनी निर्भय कन्या अभियानाबद्दल माहिती व अभियानाचे महत्त्व विद्यार्थिनींना समजावून सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. राजू सानप यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत हिंदी विभागप्रमुख प्रा. प्राजक्ता जोशी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अश्विनी ठाकरे तर आभार प्रा. गायत्री हरळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, प्राध्यापिकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.