इगतपुरी : ना लॉन्स, ना पत्रिका वाटपाची दगदग…सर्वच पारंपारिक गोष्टींना फाटा देत कोणताही बडेजाव न मिरविता इगतपुरीत साखरपुड्यातच झालेला विवाह सोहळा चर्चेचा विषय ठरला आहे. या विवाह सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
लग्नसोहळा म्हटला की ओघाने अनेक विधी आलेच. एवढेच नाही तर जुन्या परंपरा, मानपान, खानपान, मंडप सजावट, महागड्या कपड्यांची खरेदी, हजारो लग्नपत्रिका छापून गावोगावी, घरोघरी वाटण्यासाठी धावपळ करावी लागते. श्रीमंतीचा रुबाब मिरविण्यासाठी आलिशान लॉन्सवर विवाह लावणे तर प्रतिष्ठेचे समजले जाते. हा बडेजाव मिरविताना प्रसंगी वेळेवर कर्जबाजारीही व्हावे लागते.
इगतपुरी तालुक्यातील खेडचे जाधव आणि दिंडोरी तालुक्यातील भनवड गावचे पवार परिवाराने समाजापुढे एक नवीन आदर्श घालून दिला आहे. खेड येथील नाभिक समाजाचे प्रतिष्ठित प्रगतशील शेतकरी व कळसुबाई मित्र मंडळाचे गिर्यारोहक भानुदास जाधव यांची कन्या कोमल हीचे शिक्षण बीकॉमपर्यंत झाले आहे. तिचा विवाह अवनखेड येथील नामदेव पवार यांचे चिरंजीव मेकॅनिकल इंजिनिअर सौरव याच्याशी ठरला. त्यानुसार सोमवारी वधूच्या घरी साखरपुड्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी घोटी शहरातील प्रतिष्ठित असलेल्या ठराविक व्यक्तींनी साखरपुड्यातच विवाह सोहळा पार पाडावा, असा वधू आणि वर पक्षाला सल्ला दिला . त्यास दोन्ही बाजूने त्वरित होकार देण्यात आला. भटजींनेही सायंकाळी सातचा मुहूर्त काढून दिला. त्यानंतर युद्धपातळीवर लगीनघाई सुरू झाली. भाऊबंद, नातेवाईक, मित्र मंडळीने मोलाचे सहकार्य केल्याने मोबाईलवरून शक्य तितक्या लोकांना निमंत्रण देण्यात आले. लग्न समारंभासाठी लागणार्या सामानाची जमवाजमव करण्यात आली. उत्तम प्रकारे जेवणाची व्यवस्था करण्यात आली. अवघ्या पाच तासात 300 ते 350 वर्हाडी मंडळींच्या उपस्थितीत विवाहसोहळा अतिशय कमी खर्चात संपन्न झाला. सोहळा यशस्वी करण्यासाठी कळसुबाई मित्र मंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप चौधरी, ज्ञानेश्वर कडवे, शाहीर बाळासाहेब भगत, उद्योजक संदीप शहाणे, ज्ञानेश्वर भागवत, आत्माराम कोरडे, मिथुन बिडवे, फौजी मनोज भोसले, संजय सूर्यवंशी, शिवाजी येलमामे, प्रकाश कोरडे, वाल्मीक रायकर, रमेश रायकर, दीपक मराडे, योगेश जाधव यांनी परिश्रम घेतले.
गोष्ट एका लग्नाची घोटीत झालेला सोहळा चर्चेचा विषय ठरला
RELATED ARTICLES
Recent Comments
on Hello world!