Homeशासकीय बातमीमनपाच्या रस्ते सुरक्षा अभियान अंतर्गंत वाहतूक जनजागृती रॅली 100 विद्यार्थ्यांचा सहभाग

मनपाच्या रस्ते सुरक्षा अभियान अंतर्गंत वाहतूक जनजागृती रॅली 100 विद्यार्थ्यांचा सहभाग

नाशिक महानगरपालिका आणि विबग्योर ग्रुप ऑफ स्कूल्स, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. 16 डिसेंबर रोजी वाहतूक जनजागृती रॅली काढण्यात आली. रस्त्यावरील अपघातांमुळे होणारे मृत्यु अथवा गंभीर जखमी वा जायबंदी होण्याचे प्रमाण कमी होण्यासाठी मुख्यत्वे नागरीकांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. वाहतुकीचे नियम जसे की हेल्मेट सक्ती, सिग्नलचे टायमिंग, वेग मर्यादा पाळणे याबाबत प्रतिसाद वाढल्यास अपघात मर्यादीत होण्यास मदत होणार आहे. या घटकांवर भर देणे आवश्यक असल्यामुळे रस्ते सुरक्षा अभियान अंतर्गंत मखमलाबाद-तारावाला लिंक रोड येथील शाळेच्या प्रांगणातून मनपाचे अतिरीक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या उपस्थितीत सकाळी 10 वाजता रॅलीला सुरुवात झाली. सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक अनिकेत साळुंखे यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. प्रदीप चौधरी यांनी वाहतूक जनजागृतीचे महत्व सांगून रॅलीच्या माध्यमातून पालक, वाहनधारकांपर्यंत नियम पाळण्याचा संदेश पोचवण्याचा प्रयत्न केला जातोय. याचा नक्कीच परीणाम होईल, असं आपल्या भाषणात सांगितले. शाळेपासून सुरु झालेल्या रॅलीचा समारोप तारावाला सिग्नल इथे झाला. विद्यार्थी आणि अधिका-यांच्या हातात हेल्मेट वापरण्याचे फायदे तसेच वाहतुकीच्या नियमांबाबत फलक होते. काही फलकांवर वाहतूक नियमांची घोषवाक्य लिहिली होती. काही मुलांनी हेल्मेट घालून रॅलीत सहभाग घेत घोषणा दिल्या. विना हेल्मेट दुचाकी वाहन चालवणा-यांना गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांनी हेल्मेटचे महत्व सांगितले. अशा वाहनधारकांसोबत फोटोही काढले. सुमारे 100 विद्यार्थ्यांचा रॅलीत सहभाग होता.
अशा प्रकारे शालेय विद्यार्थी यांच्यामार्फत पालकांपर्यंत पर्यायाने समाजापर्यंत संदेश पोहोचविण्याच्या दृष्टीने यापुढे सतत उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
शहर अभियंता शिवकुमार वंजारी, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे, जनसंपर्क अधिकारी गिरीश निकम, विशाल तांबोळी, शाळेतील प्रशासन प्रमुख प्रशांत मंत्री, शाळेतील वाहतूक कक्ष प्रमुख आर्यन वाकचौरे आणि सर्व शिक्षक यावेळी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!