Homeशासकीय बातमीमनपाकडून विशेष मोहिमेत वंचित बालकांना लस

मनपाकडून विशेष मोहिमेत वंचित बालकांना लस

शहरात गोवर रुबेला लसीकरण मोहीमेला सुरुवात
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने निर्देशीत केल्याप्रमाणे नाशिक महानगरपालिकेकडून आज गुरुवार दि. १५ डिसेंबरपासून गोवर रुबेला लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी १२ ठिकाणी विशेष वंचित लसीकरण सत्र आयोजित करण्यात आलेले होते. या सत्रात गोवर रुबेलाचे एकूण २७५ बालकांचे लसीकरण करण्यात आले. त्यात आरोग्य सेविकांच्या मार्फत १३६ बालकांना एमआर १ चा डोस तर एमआर २ चा डोस १३९ बालकांना देण्यात आला. मा. मनपा आयुक्त आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शन सूचनांनुसार सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. अजिता साळुंखे यांच्या वैद्यकीय पथकाने औरंगाबाद नाका, पंचवटी येथे भेट दिली. या परिसरात काही स्थलांतरीत नागरिक राहतात. तेथील पालक बालकांना डोस घेण्यास तयार नव्हते. यावेळी नागरिकांचे समुपदेशन करण्यात आले. त्यांना लसीकरणाचे महत्व पटवून देण्यात आले. समुपदेशन केल्यानंतर नागरिक बालकांचे लसीकरण करण्यास तयार झाले. यावेळी आशा सेविकेने बालकांना एक ठिकाणी बोलावून १७ वंचित बालकांना MR १ चा पहिला डोस देण्यात आला. वैद्यकीय पथकात युनिसेफ सल्लागार डॉ. सुमेध कुदळे, युनिसेफ क्षेत्र समन्वयक नलिनी चास्कर, तपोवन युपीएचसी वैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका पाटील, पीएचएन सुनीता गांगुर्डे, एएनएम मनीषा खोलासे, आशा सेविका चित्रा पवार यांचा सहभाग होता.

लसीकरणाचे दोन टप्पे

दरम्यान पहिल्या टप्यात १५ डिसेंबर ते २५ डिसेंबर आणि दुसऱ्या टप्प्यात १५ जानेवारी २०२३ ते २५ जानेवारी २०२३ या कालावधीत गोवर रुबेला लसीकरण होणार आहे. नाशिक शहरातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मोहिमेत महापालिका क्षेत्रात आरोग्य सेविका, आशा सेविका, अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार आहेत. ९ महिने ते ५ वर्षे वयाच्या बालकांचा गोवर रुबेला लसीचा पहिला किंवा दुसरा डोस अथवा दोन्ही डोस राहिलेल्या बालकांची यादी तयार करण्यात आली आहे. लसीच्या दोन डोसमधील अंतर २८ दिवस असेल याची खबरदारी घेण्याची सूचना शासनाच्या आरोग्य विभागाने केली आहे. या मोहिमेत स्थानिक वैद्यकीय व्यवसायिक संघटना आणि बालरोग तज्ज्ञ संघटना यांचाही सहभाग असावा, अशी सूचना देण्यात आल्या. नाशिक शहरातील पालकांनी गोवर रुबेला लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा, सर्व्हेक्षणाला येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेचे वैद्यकीय (आरोग्य) अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!