जैतर. . .एका सत्यघटनेतून बोध घ्यायला लावणारी अनोखी प्रेमकहाणी
१४ एप्रिल पासून प्रदर्शित होणार
नाशिक : शहर
जैतर. . .चित्रपटाचे शीर्षक वाचून त्या शब्दाचा नेमका अर्थ काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. जसे ‘मित्र’ ह्या शब्दाला ग्रामीण बोलीभाषेत ‘मैतर’ असेही संबोधले जाते, अगदी त्याच्या विरुद्धार्थी अर्थ ‘जैतर’ ह्या शब्दाचा होतो. म्हणजेच हितचिंतक नसलेला तो ‘जैतर’. अर्थात, हा शब्द उत्तर महाराष्ट्रात खान्देश प्रांतातातील बोलीभाषेत प्रचलित आहे.
‘जैतर’ ही एका विद्यार्थीदशेतील प्रेमीयुगुलाची, मालेगावात घडलेल्या एका सत्यघटनेवर आधारित गोष्ट आहे. जाती, वर्ण, आर्थिकस्तर आदी गोष्टींवरून समाजात अनेक स्तर निर्माण होतात, भेदाभेद होतात. त्याचे पडसाद अनेकदा प्रेमप्रकरणात किंवा लग्नादरम्यान उमटतात आणि संघर्ष निर्माण होतो. परंतु, बऱ्याचदा त्या संघर्षाची मोठी किंमत ही स्त्रियांना मोठ्या प्रमाणात चुकवावी लागते. चित्रपटाचे कथालेखक आणि निर्माते मोहन घोंगडे हे मूळ शेतीव्यावसायिक आहेत. मालेगावात प्रेमप्रकरणावरून घडलेल्या ‘त्या’ सत्यघटनेत त्यांना एक गंभीर समस्या दिसली आणि त्यांचे संवेदनशील मन व्यथीत झाले. त्या समस्येला वाचा फोडण्यासाठी त्यांनी ही कथा लिहीली आणि त्याला समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी सिनेमा हे माध्यम निवडले व ‘जैतर’ ह्या सिनेमाची निर्मिती झाली.
चित्रपटाची पटकथा-संवाद आणि दिग्दर्शन घन:श्याम पवार यांचे आहे. कथानकाची गरज ओळखून चित्रीकरण खान्देशात करण्यात आले आहे. त्यामुळे चित्रपटाला एक खानदेशी स्पर्श लाभला आहे. ह्या सिनेमात रजत गवळी आणि सायली पाटील हे दोन नवोदित कलाकार प्रमुख भूमिकेत असून गणेश सरकटे, गायत्री सोहम, अविनाश पोळ, रामेश्वर डापसे, अरुण गीते, स्मिता प्रभू, जीवन महीरे तसेच संग्राम साळवी सह इतर कलाकारांनी भूमिका वठविल्या आहेत.
संगीतकार योगेश खंदारे यांनी संगीतबद्ध केलेली गाणी हे ह्या चित्रपटाचे बलस्थान आहे. गीतकार मंगेश कांगणे, विष्णू थोरे आणि योगेश खंदारे यांच्या रचनांना सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते, आदर्श शिंदे, हर्षवर्धन वावरे, कस्तुरी वावरे आणि संगीतकार योगेश खंदारे यांनी स्वरसाज चढविला आहे.
प्रेमसंबंधातून घडलेल्या एका सत्यघटनेवर आधारित, शिवमल्हार पुजा फिल्म प्रोडक्शन निर्मित, निर्माता मोहन घोंगडे लिखित, घन:श्याम पवार दिग्दर्शित, धीरज वाघ यांच्या कॅमेरातून दिसणारा आणि संगीतकार योगेश खंदारे यांच्या संगीतसाजाने नटलेला ‘जैतर’ हा चित्रपट येत्या १४ एप्रिल रोजी महाराष्ट्रभर सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.